संजय राऊतांविषयी सेनेत वाढती नाराजी

June 14, 2010 10:58 AM0 commentsViews: 2

विनोद तळेकर

14 जून

राऊत यांची नाशिकच्या संपर्कनेतेपदी निवड झाल्यानंतर तेथील शिवसैनिकांनी त्यांचा पुतळा जाळून रोष व्यक्त केला. खरे तर राऊतांच्या विरोधातील नाराजी अचानक उफाळून आलेली नाही. हा राग फार पूर्वीपासून शिवसैनिकांच्या मनात धुमसत आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेने जी आंदोलने केली, मग ते शाहरुखच्या विरोधातील असो की राहुल गांधींच्या विरोधातील. ही आंदोलने फसली, त्याला कोण कारणीभूत आहे, असा सवाल आता शिवसैनिक खाजगीत विचारत आहेत.

संजय राऊतांचे मातोश्रीवरचे संबंध लक्षात घेता त्यांच्या विरोधात उघडपणे बोलण्याचे धाडस मात्र शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांमध्ये नाही. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या पराभवानंतर मनसेच्या विरोधात संजय राऊतांनी रान उठवले. पण राज ठाकरेंनी जोरदार प्रतिहल्ला चढवल्यानंतर लगेचच त्यांनी आपली भूमिका सौम्य केली.

शिवसेनेसाठी आपल्या जिवाची बाजी लावणारा शिवसैनिक जर नाराज असेल तर पक्षासाठी ते घातक ठरू शकते, अशी नाराजी संजय राऊतांसह अनेक शिवसेना नेत्यांच्या बाबतीत आहे . नाशिकमध्ये झालेला प्रकार ही कदाचीत सुरुवात असू शकेल. त्यामुळे शिवसेना नेतृत्वाला ही बाब दुर्लक्षून चालणार नाही.

'बाळासाहेबांचा माझ्यावर विश्वास'

नाशिकमध्ये माझा पुतळा जाळणारे भाडोत्री होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी शिवसेनेवर हल्ला चढवताना संजय राऊत यांना टीकेचे लक्ष्य केले होते. त्यानंतर शिवसेनेतच राऊतांविरोधात नाराजी उफाळून आली.

close