भोपाळ दुर्घटना प्रकरणात पंतप्रधान उतरले

June 14, 2010 5:40 PM0 commentsViews: 57

14 जून

भोपाळ गॅस दुर्घटनेतील मुख्य आरोपी वॉरेन अँडरसनला देशाबाहेर कुणी जाऊ दिले आणि त्यात तत्कालीन केंद्र सरकारची काय भूमिका होती, यावर सध्या राजकीय वाद सुरू आहे.

या वादात आता पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हस्तक्षेप केला आहे. या दुर्घटनेप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाने लवकरात लवकर बैठक घ्यावी, आणि 10 दिवसांच्या आत अहवाल सादर करावा, असे आदेश पंतप्रधानांनी दिले आहेत. त्यानुसार मंत्रिगटाची बैठक 17 जून रोजी होणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम हे या मंत्रिगटाचे अध्यक्ष आहेत. आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद, कायदामंत्री वीरप्पा मोईली, आणि रस्ते वाहतूक आणि हायवे मंत्री कमलनाथ हे या मंत्रिगटातील इतर सदस्य आहेत. दरम्यान पंतप्रधान मनमोहनसिंग आणि गृहमंत्री चिदंबरम यांनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची आज भेट घेतली.

हा मंत्रिगट पुढील मुद्द्यांमध्ये लक्ष घालेल…

युनियन कार्बाईडचा सीईओ वॉरेन अँडरसनच्या हस्तांतरणाची नव्याने विनंती करणे

गॅस दुर्घटनेतल्या पीडितांची मदत वाढवणे

ट्रायल कोर्टाच्या निकालाला आव्हान देण्याबाबत विचार करणे

अरुण नेहरुंचा खुलासा

दरम्यान, राजीव गांधी यांचे विश्वासू सहकारी आणि माजी केंद्रीय मंत्री अरूण नेहरू यांनी या प्रकरणात आणखी एक नवा खुलासा केला आहे.

अँडरसन केवळ भारतातून पळाला नाही, तर त्याने तत्कालीन गृहमंत्री पी. नरसिंह राव आणि राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांची भेट घेतली. इतकेच नाही, तर या भेटीत काय झाले, याचे सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

close