समदला जामीन, एटीएसची नाचक्की

June 15, 2010 11:54 AM0 commentsViews: 6

15 जून

पुणे बॉम्बस्फोटातील संशयीत आणि शस्त्रास्त्र कायद्याखाली अटक केलेला अब्दुल समद याला जामीन मंजूर झाला आहे. 25 हजारांच्या जात मुचलक्यावर त्याला सोडण्यात आले.

संशय असला तरी अब्दुल समदला जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी अटक केलेली नव्हती. तर दुबईवरून परतल्यानंतर मेंगलोर विमानतळावर त्याला शस्त्रास्त्रांच्या अवैध व्यापार प्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. त्याचा रिमांड नको, असेही एटीएसने गेल्या सुनावणीत सांगितले होते.

पण समदच्या अटकेनंतर पुणे बॉम्बस्फोटाच्या चौकशीत मोठी कामगिरी केली म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलिसांची पाठही थोपटली होती. पण आता समदला जामीन मंजूर झाल्यानंतर पोलिसांकडे त्याचा पुणे बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचे पुरावे नसल्याचे स्पष्टझाले आहे. म्हणूनच त्याला याप्रकरणी अटक करण्यात आलेली नव्हती.

कोण आहे अब्दुल समद?

जर्मन बेकरीमधील सीसीटीव्ही फुटेज तपास जेव्हा अधिकार्‍यांनी तपासले, तेंव्हा त्यात तीन संशयित आढळून आले. 19 मार्चला पोलिसांना पहिले यश मिळाले.

त्यातील एक फोटो तपासाला वेगळे वळण देणारा ठरला. त्या संशयीताचे फोटो देशभरातील तपास यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणांना पाठवण्यात आले. कर्नाटक पोलिसांनी त्याला ओळखले. संशयीत आरोपी हा यासिन भटकळचा भाऊ अब्दुल समद असल्याची ओळखही पटली.

त्यानंतर तातडीने अब्दुल समदच्या अटकेची नोटीस काढण्यात आली. 27 फेब्रुवारीलाच अब्दुल समद देशाबाहेर पळाला होता. तो मंगलोरमार्गे दुबईला पळून गेल्याची माहिती गुप्तहेर संघटनांना मिळाली होती.

केंद्रीय संस्थांनी दुबईतल्या ऍथोरिटीला त्याबाबत कळवले. अब्दुलला अटक करण्याआधी त्याचे फोन कॉल टॅप करण्यात आले. अब्दुलला मंगलोरहून मुंबईला आणल्यावर त्याचा ताबा महाराष्ट्र एटीएसकडे देण्यात आला.

चुकीची कबुली

दरम्यान तपासात एटीएसकडून चूक झाल्याची कबुली पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांनी दिली आहे.

या सगळ्या प्रकारामुळे पुणे बॉम्बस्फोटाचा तपास आणि एटीएसबद्दल काही सवाल उभे राहिले आहेत…

अब्दुल समदला चुकीची व्यक्ती समजून अटक करण्यात आली का?

2009 च्या आर्म्स ऍक्ट एफआयआरमध्ये अब्दुल समदचे नाव का नव्हते?

केवळ पुणे स्फोटाशी समदचा संबंध तपासण्यासाठी त्याला आर्म्स ऍक्टखाली अटक करण्यात आली होती काय?

पुणे स्फोटात समदला संशयित म्हणून घोषित करण्यात पोलिसांनी घाई केली का?

समदला अटक करून पुणे स्फोट प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल केंद्राने एटीएसची पाठ का थोपटली?

close