खैरलांजीचा निकाल 14 जुलै रोजी

June 15, 2010 1:35 PM0 commentsViews: 109

प्रशांत कोरटकर, नागपूर

15 जून

खैरलांजी हत्याकांड खटल्याचा निकाल आता 14 जुलै रोजी जाहीर होणार आहे.

मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात या प्रकरणाचा खटला गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. न्यायमूर्ती एस. आर. चव्हाण नागपूरमध्ये उपस्थित नसल्याने हा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे.

चार वर्षांपूर्वी भैय्यालाल भोतमांगे यांच्या संपूर्ण कुटुंबाची खैरलांजी गावात निर्घृण हत्या करण्यात आली. चार वर्षे उलटून गेली. पण भैय्यालाल यांच्या मनात त्याची आठवण आजही कायम आहे. या प्रकरणातील दोषींना शिक्षा व्हावी, या एकच उद्देशाने ते आजही कोर्टात आले होते.

29 सप्टेंबर 2006 ला भोतमांगे कुटुंबातील सुरेखा, प्रियंका, सुधीर आणि रोशन यांची हत्या करण्यात आली. या हत्याकांडाची चर्चा संपूर्ण देशात झाली. आधी सीआयडी आणि नंतर सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.

भंडार्‍याच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने 8 लोकांवर आरोप ठेवले. यात 6 आरोपींना फाशी, तर 2 लोकांना जन्मठेप सुनावण्यात आली. या प्रकरणातून ऍट्रॉसिटी वगळल्याबद्दल दलित कार्यकर्ते नाराज आहेत. या प्रकरणाचा एक वर्ष हायकोर्टात युक्तीवाद चालला आहे. आता प्रतीक्षा निकालाची आहे.

सर्वस्व हरवलेले भैय्यालाल प्रत्येक तारखेला कोर्टात हजर राहतात. प्रत्येक वेळी त्यांना आशा असते, त्यांचे कुटुंब उध्वस्त करणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा होण्याची…

close