जसवंत सिंग भाजपमध्ये परतणार

June 15, 2010 5:21 PM0 commentsViews: 11

भूपेंद्र चौबे, आशिष दीक्षित, नवी दिल्ली

15 जून

जसवंत सिंग आता भाजपमध्ये परत येणार आहेत. जिनांच्या मुद्द्यावरून मतभेद झाल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली होती. पण आता वातावरण निवळले आहे. जसवंत सिंगांना परत घेण्याबद्दल भाजपच्या हायकमांडमध्ये एकमत झाले आहे. येत्या दोन दिवसांमध्ये पक्षाध्यक्ष नितीन गडकरी याविषयीची औपचारिक घोषणा करतील, अशीही बातमी आहे.

नऊ महिन्यांपूर्वी भाजपच्या शिमल्यामधील चिंतन बैठकीत जसवंत सिंगांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यांचा गुन्हा होता, जिनांची स्तुती करणे आणि त्यासोबतच सरदार पटेलांवर टीका करणे. पण आता भाजपने हा कटू अध्याय मागे सोडून जसवंत सिंगांना माफ करायचे ठरवले आहे. वर्षभरापूर्वी पक्ष बेशिस्त झाला असताना जसवंत यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे होते. पण मुळात तो एक भला माणूस आहे, असे आता भाजपचे नेते सांगत आहेत. त्यांच्या परतीची औपचारिक घोषणा झाली नसली, तरी संकेत मात्र स्पष्ट आहेत.

पक्षाबाहेर असताना जसवंत सिंगांनी भाजपमधील काही नेत्यांवर विशेषत: लालकृष्ण अडवाणींवर जोरदार टीका केली होती. पण आता त्याच अडवाणींच्या प्रयत्नांमुळे जसवंत सिंगांसाठी पुनर्प्रवेशाचा दरवाजा उघडला आहे. भैरोसिंग शेखावत यांच्या निधनाच्या वेळी अडवाणी आणि जसवंत एकत्र दिसले होते. आणि त्यानंतर काही दिवसांतच आयबीएन नेटवर्कशी बोलताना जसवंत सिंगांनी भाजपची स्तुती केली होती..

भाजपच्या पाटण्यातील राष्ट्रीय कार्यकारिणीतच जसवंत सिंगांविषयीची घोषणा होणार होती. पण नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या वादामुळे ती टाळण्यात आल्याचे समजते. आता नितीन गडकरी येत्या दोन दिवसांत औपचारिक घोषणा करतील. त्यांच्यानंतर आता उमा भारती पक्षात कधी परतणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

close