कमलाकर नाडकर्णी यांचा गौरव

June 16, 2010 10:18 AM0 commentsViews: 6

माधुरी निकुंभ, मुंबई

16 जून

ज्येष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचा अमृत महोत्सवी सोहळा शिवाजी मंदिर इथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी नाट्यसृष्टीतील अनेक कलाकार व तंत्रज्ञांनी हजेरी लावली. गेली अनेक वर्षे नाट्य समीक्षा करणार्‍या कमलाकर नाडकर्णी यांना या वेळी सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.

नाट्यकर्मी आणि वृत्तपत्र वाचकांमध्ये कमलाकर नाडकर्णी सुपरिचित आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून नाटकांचा आढावा घेणार्‍या नाडकर्णी यांचा 75 वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात शिवाजी नाट्यमंदिरात साजरा करण्यात आला. मराठी नाटकांवर नाडकर्णी यांनी भरपूर लिहिले. यानिमित्ताने नाट्यव्यसायाशी जोडलेल्या अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.

नाट्यक्षेत्रातून मिळालेल्या या अलोट प्रेमाने नाडकर्णीही भारावून गेले.

नाडकर्णी यांच्या लेखणीने अनेक नाटकांची समीक्षणे केली. त्यांच्या लिखाणातून नाटकाच्या संहितेवरच नाही तर नाट्यसादरीकरण आणि कलाकारांचा अभिनय यावरही प्रकाश टाकला गेला. अनेक नाटकांना त्यांच्या समीक्षेमुळे प्रेक्षकवर्ग मिळाला. इतकेच नाही तर दर्जेदार अभिनय करणार्‍या नाट्य कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासही ते कधी विसरले नाहीत.

अशोक मुळे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या समारंभात अशोक मुळे यांच्याच खुमासदार निवेदनाने हास्याचे रंग भरले. यावेळी जीवनगाणीतर्फे चंद्र आहे साक्षीला हा रंगारंग कार्यक्रमही सादर झाला. एखाद्या समीक्षकाच्या पंचाहत्तरीचा कार्यक्रम इतक्या मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात पार पडण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल.

close