ठाण्यात भिंत कोसळून 8 ठार

June 16, 2010 2:39 PM0 commentsViews: 3

16 जून

मुसळधार पावसामुळे ठाण्यामध्ये झोपड्यांवर भिंत कोसळून 8 जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर 7 जण जखमी झाले आहेत.

ज्ञानेश्वरनगरमध्ये ही घटना घडली. पावसामुळे येथील दोस्ती कन्स्ट्रक्शनची भिंत कोसळून झोपड्यांवर पडली. जवळपास 8 झोपड्या या कंपाऊंड वॉलखाली दबल्या.

एक लाखांची मदत

दरम्यान या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 8 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसेच गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची तर किरकोळ जखमींना 5 हजार रूपयांची मदत दिली जाईल, असेही ते म्हणाले.

मुंबईत पाऊस सुरू

मुंबईमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबई उपनगरांमध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. कुर्ला, ठाणे, विक्रोळी या भागातही जोरदार पाऊस सुरू आहे. तर मध्यरेल्वेच्या लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत होत्या. हिंदमाता परिसरात सकाळपासून पाणी साचले होते.

तर कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर अंबरनाथ इथे पावसाचा जोर कायम आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस पडत अहो. पावसामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.

धरणांच्या साठ्यात वाढ

रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे काही धरणांच्या साठ्यात वाढ झाली आहे. एक नजर टाकूया या पाणीसाठ्यांवर…

मोडक सागर – 20 टक्के

तानसा – 20 टक्के

तुळशी – 3 टक्के

विहार – 77 टक्के

वैतरणा – 62 टक्के

भातसा – 21 टक्के

close