हिंदमाताजवळ पुन्हा पाणी साचले…

June 17, 2010 10:48 AM0 commentsViews: 1

17 जून

मुंबईतील परळच्या हिंदमाता सिनेमागृहाजवळ प्रत्येक वर्षी पावसाळ्यात पाणी तुंबते. अगदी कमी पाऊस पडला तरी या भागात पाणी तुंबतेच. कालच्या पावसानेही दरवर्षीप्रमाणेच पाणी तुंबल्याचे चित्र मुंबईकरांना दिसले.

महत्त्वाचे म्हणजे तिथून काही अंतरावरच मनपाचा एफ-साऊथ वॉर्ड आहे. दरवर्षी लोकांच्या तक्रारींचा पाऊस पडल्यानंतरही येथील तुंबलेले पाणी साफ करण्यात मनपाकडून काही विशेष उपाययोजना झाल्या नाहीत.

आयुक्तांची भेट

काल हिंदमाताजवळ पाणी तुंबल्यानंतर मनपा आयुक्त स्वाधीन क्षत्रिय आणि मुख्य सचिव जे. पी. डांगे यांनी आज हिंदमाताला भेट देण्याचा कार्यक्रम आखला.

साहेब येणार म्हटल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले. तातडीने हिंदमाताजवळ मनपा कर्मचारी , इंजीनिअर्स पहाटेपासूनच कामाला लागले. तुंबलेले रस्ते साफ केले गेले. रस्त्यावरील कचरा हटवून रस्ते चकाचक केले गेले.

साहेबांनी रोज यावे…

साहेबांची स्वारी आली आणि मोकळ्या, साफसफाई झालेल्या रस्त्याची पाहणी करून निघून गेली…जो-तो साहेबांसमोर आपल्या कामाची माहितीही देऊ लागला. साहेबही खूष झाले. आणि मनपा कर्मचार्‍यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.

साहेबांसाठी रस्ते अशा पद्धतीने साफ होत असतील तर पावसाळ्यात दररोज साहेबांची गाडी आपल्या इथे यावी अशी मागणी आता परळमधील नागरिकांनी केली आहे…

close