मराठवाड्यात विनापरवाना बियाणे

June 17, 2010 12:51 PM0 commentsViews: 18

माधव सावरगावे, औरंगाबाद

17 जून

शेतकर्‍यांना विकल्या जाणार्‍या बियाणांच्या बाबतीत सरकार किती गाफिल आहे, याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. दुसर्‍या राज्यातील बियाणे महाराष्ट्रामध्ये विनापरवाना कशी विकली जातात, याचा गौप्यस्फोट 'आयबीएन-लोकमत'च्या टीमने केला आहे.

औरंगाबादमध्ये विकल्या जाणार्‍या 0839 लॉट नंबरच्या मका बियाणांच्या बॅगा थेट आंध्रप्रदेशमधल्या वारंगळहून आल्या आहेत. या बियाण्यांची औरंगाबाद जिल्ह्यात सर्रास विक्रीही सुरू आहे.

नियमानुसार हे बियाणे महाराष्ट्रामध्ये विकताच येत नाही. याची माहिती मिळाल्यानंतर 'आयबीएन-लोकमत'च्या टीमने तपासाला सुरुवात केली. आम्ही आधी थेट आकाश एजन्सीमध्ये गेलो…त्यावेळी आम्हाला तिथे ही बियाणी आढळून आली…त्याचा लॉट नंबरही तपासला…त्यानंतर आम्ही कृषी अधिकार्‍यांना माहिती दिली. अखेर कृषी विभागाला कारवाई करावी लागली.

आंध्र प्रदेशमध्ये सबसीडी असल्याने हे बियाणे तेथील शेतकर्‍यांना अत्यंत कमी किंमतीमध्ये उपलब्ध होते. हे बियाणे तयार करताना त्या त्या प्रदेशाच्या हवामान, जमीन याचा विचार केला जातो. असे बियाणे आपल्या इथे वापरल्यास पिकांना हानिकारक ठरू शकते.

खत आणि बियाणांचा काळाबाजार थांबावा तसेच त्याच्या विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात 50 पेक्षा जास्त पथके निर्माण केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र औरंगाबादमधील बियाण्यांच्या दुकानात फिरल्यावर सरकारी दावे किती फसवे ठरतात ते दिसून येते.

close