‘बेस्ट फाईव्ह’ला हायकोर्टात आव्हान

June 17, 2010 1:38 PM0 commentsViews: 3

17 जून

अकरावी प्रवेशासाठी राज्य सरकारने घेतलेल्या बेस्ट फाईव्ह फॉर्म्युलाला 21 पालकांनी मिळून मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे.

राज्य सरकारने 11 वी प्रवेशप्रक्रियेसाठी बेस्ट फाईव्ह सूत्र लावण्याचा निर्णय यंदा घेतला होता. 25 फेब्रुवारीला तसा जीआरही काढण्यात आला होता. परंतु आयसईएसई बोर्डाच्या पालकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. आयसीएसईला सहा विषय आहेत.

त्यामुळे त्यांनाही बेस्ट फाईव्ह लागू करण्यात यावे, अशी मागणी कोर्टात करण्यात आली आहे.

एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी त्यांच्या एकूण 6 विषयांपैकी दिली जात असे. मात्र, केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांशी असलेली स्पर्धा लक्षात घेता सर्वाधिक गुण मिळवलेल्या 5 विषयांतील गुणच यापुढे गृहीत धरण्यात येतील आणि त्याआधारेच टक्केवारी काढली जाईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

यामुळे एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढेल आणि आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, असा पालकांचा आरोप आहे. सीबीएसई बोर्डासाठी 5 विषयांमधीलच गुण गृहीत धरले जातात. त्यामुळे त्यांना या निर्णयाचा फटका बसणार नाही.

दहावीचा हा निकाल बेस्ट फाईव्हच्या निकषानुसार लावला गेला आहे. तर विशेष म्हणजे शुक्रवारी 18 जूनला बेस्ट फाईव्हच्या निर्णयावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

बेस्ट फाईव्ह म्हणजे काय?

बेस्ट फाईव्ह म्हणजे सर्वोत्तम पाच विषयांतील गुण हेच यापुढे महत्वाचे ठरणार आहेत. सर्वच्या सर्व म्हणजे सहा विषयांत पास होणे बंधनकारक असले, तरीसुद्धा कोणत्या विषयात सर्वाधिक मार्क्स हवेत याचे काही बंधन नाही.

साहजिकच विद्यार्थ्यांना स्कोअरिंगसाठी भाषा विषयाची अडचण ठरते. बेस्ट फाईव्ह फॉर्म्युलामुळे भाषा विषयाला आता दुय्यम दर्जा दिला जाणार आहे. मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषा ज्यांना जड वाटते ते पासिंगपुरते या विषयात गुण मिळवतील आणि स्कोअरिंगसाठी मात्र दुसर्‍या विषयांचा आधार घेतील.

त्याचा फटका म्हणून यापुढच्या काळात भाषा विषय अभ्यासातूनही मागे पडेल, अशी भिती काही जण व्यक्त करत आहेत.

close