औरंगाबादमध्ये शिवसेनेचा राडा

June 19, 2010 11:18 AM0 commentsViews: 7

19 जून

स्थायी समिती सभापती राजू शिंदे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून औरंगाबाद महापालिकेत शिवसेना नगरसेवकांनी तोडफोड केली.

शिवसेना नगरसेवकांच्या या गुंडगिरीमुळे आता औरंगाबादच्या महापालिकेतील युतीचे संबंध ताणले जाणार हे निश्चित आहे.

औरंगाबाद मनपातील स्थायी समितीच्या सभापतीपदावरून काही दिवसांपूर्वी शिवसेना-भाजपमध्ये वाद झाले होते. भाजपच्या राजू शिंदे यांनी स्थायी समितीपद मिळवल्यानंतर शिवसेना दुखावली होती.

अशातच आज स्थायी समितीची बैठक होती. त्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी सभापती राजू शिंदे यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. हे नगरसेवक एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी शिवसेनेच्या राडा संस्कृतीप्रमाणे खुर्चा उचलून सभागृहातील काचा फोडल्या.

नगरसेवकांच्या गुंडगिरीमुळे अखेर आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी पोलिसांना बोलवले. यावेळी हे नगरसेवक पोलिसांनाही जुमानत नव्हते.

अखेर या गुंडगिरी करणार्‍या नगरसेवकांना महापालिका इमारतीबाहेर आणले. त्यानंतरही त्यांची अरेरावी सुरुच होती. यावेळी झालेल्या बाचाबाचीत शिवसेनेचे नगरसेवक दिग्विजय शेरखाने जखमी झाले.

अटकेची मागणी

यानंतर भाजप नेत्यांनी या तोडफोड प्रकरणी दोषींना अटक करण्याची मागणी केली. यासाठी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

सेनेचे प्रतिक्रिया अशीच असते

दरम्यान खासदार संजय राऊत यांनी या तोडफोडीचे समर्थन केले आहे. शिवसेनेची प्रतिक्रिया अशीच असते, असे त्यांनी म्हटले आहे.

बागडेंच्या घरावर हल्ला

यानंतर भाजपचे औरंगाबादमधील नेते हरिभाऊ बागडे यांच्या ऑफिसवर हल्ला झाला. अज्ञात लोकांनी त्यांच्या घरावर दगडफेक केली. एन-5 या भागात बागडेंचे ऑफीस आहे.

गुन्हे दाखल करणार

औरंगाबादमधल्या या सगळ्या हिंसक प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल, असे पालिका आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले. तोडफोड करणार्‍यांवर गुन्हे दाखल केले जातील, असेही भापकर म्हणाले.

सर्वसाधारण सभेत पडसाद

सकाळी झालेल्या तोडफोडीचे पडसाद दुपारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये पडले. राष्ट्रगीत सुरू असतानाच तोडफोड करणार्‍या नगरसेवकाचे पद रद्द करण्यात यावे आणि गुन्हा दाखल करावा ही मागणी करीत भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

या दरम्यान भाजप आणि शिवसेना नगरसेवकांदरम्यान जोरदार झटापट झाली. त्यानंतर महापौरांनी सभागृहात गोंधळ घालणार्‍या भाजप नगरसेवकांचे पद एक दिवसासाठी रद्द केले. यावर भाजप नगरसेवंकानीही संताप व्यक्त केला. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही सभात्याग करून तोडफोडीचा निषेध केला.

राष्ट्रगीताचा अवमान आणि तोडफोड केल्याप्रकरणी नगरसेवकाचे पद रद्द करावे आणि गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. सकाळच्या तोडफोडीचा निषेध म्हणून या सभेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक हेल्मेट घालून आले होते.

तर दुरावा निर्माण होईल…

अशा घटनांमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण होईल. उद्वव ठाकरे यांच्याकडे आम्ही याबाबत नाराजी व्यक्त करणार आहोत. प्रतिक्रीया व्यक्त करण्याचा हा मार्ग नव्हे, असे भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

close