रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये शिक्षणसेवक भरतीस स्थगिती

June 21, 2010 12:01 PM0 commentsViews: 7

21 जून

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षणसेवक पदाच्या भरतीला स्थगिती देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशाभाऊ शिनगारे यांनी ही घोषणा केली.

राज्यातील परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परप्रांतीय बनवण्याचे राजकारण नारायण राणेंनी पहिल्यांदा सुरू केले. जिल्ह्यामध्ये परजिल्ह्यातील शिक्षण सेवकांची भरती थांबवावी, यासाठी संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी राणेंनी केली होती.

काँग्रेसला याचे श्रेय मिळू नये म्हणून मग शिवसेना आणि भाजपने कोकणात हा मुद्दा आंदोलन करुन उचलून धरला. सिधुदुर्गनंतर रत्नागिरीतही आज जिल्ह्यात शिवसेनेने शिक्षण सेवक भरती विरोधात आंदोलन केले.

स्थानिक डी. एड. उमेदवारांना त्यांच्या जिल्ह्यामध्येच नियुक्त्या मिळाव्यात, असा आग्रह धरत शिवसेनेने ही भरती प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी केली. पण या राजकारणात भरडले जात आहेतस, ते महाराष्ट्रीयन विद्यार्थी.

रत्नागिरीतही आज जिल्हा शिवसेनेने आमदार राजन साळवींच्या नेतृत्वाखाली शिक्षण सेवक भरती विरोधात आंदोलन केले.

राज्यभर भरती सुरू

राज्यात शिक्षण सेवकांची भरती प्रक्रिया सुरू आहे. डी.एड. पास झाल्यानंतर शिक्षण सेवक पदाच्या भरतीसाठी एक प्रवेश परीक्षा घेतली जाते.

त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मेरीटनुसार शिक्षणसेवक पदाची नियुक्ती पत्रे दिली जातात. त्यानंतर त्यांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी मुलाखतीसाठी बोलावले जाते.

सिंधुदुर्गमध्ये शिक्षणसेवक पदासाठी 589 जागा आहेत. तर रत्नागिरीमध्ये 1156 जागा आहेत. या दोन्ही जिल्ह्यात मेरीटनुसार फक्त 10 टक्के स्थानिक उमेदवारांना बोलावण्यात आले. रिक्त पदे आणि उपलब्ध स्थानिक उमेदवारांचा मेरीटमधील तुटवडा यामुळेच तिथे जिल्ह्याबाहेरच्या उमेदवारांना बोलावले जाते.

ही प्रक्रिया संपूर्णपणे कायदेशीर आहे. अन्यथा उमेदवारच न मिळाल्यामुळे जिल्ह्यातली ही पदे रिक्त राहतील. लोकशाही प्रक्रियेनुसार या पदांच्या भरतीवर झोनबंदी लागू नाही. त्यामुळे जिल्ह्याबाहेरचे उमेदवार इथे मुलाखतींसाठी येऊ शकतात. त्यांना तो अधिकार कायद्यानेच दिलेला आहे.

उमेदवारांचे पुण्यात आंदोलन

दुसरीकडे या उमेदवारांनी पुण्यात आंदोलन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षणसेवक भर्तीच्या वेळी स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करून जिल्ह्याबाहेरच्या उमेदवारांना हुसकावून लावले.

या विद्यार्थ्यांनी अखेर न्याय मागण्यासाठी पुण्यात राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. आपल्याच राज्यात उपरे ठरल्याची भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. आणि ही वेळ राजकारण्यांनी आणल्याचा आरोपही त्यांनी केला.

हाता तोंडाशी आलेली नोकरीची संधी या संकुचित राजकारणापायी गमावण्याची भिती त्यांना वाटत आहे. या प्रकरणी तातडीने पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी, या मागणीकरता आता या विद्यार्थ्यांनी मंत्रालयात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

close