अखेर रिक्षाचे भाडे वाढणार

June 22, 2010 9:30 AM0 commentsViews:

22 जून

मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी संपाचे हत्यार उपसल्याने अखेर रिक्षा भाढेवाढीची शिफारस झाली आहे.

पण आता या भाडेवाढीचे श्रेय कुणी घ्यायचे, यावरून शिवसेना आणि टॅक्सीमेन युनियनमध्ये वाद सुरू झाला आहे. हा वाद आज हाणामारीपर्यंत पोहचला. त्यानंतर शिवसैनिकांनी मीडियाच्या काही लोकांना धक्काबुक्की केली.

कामगार युनियनची भाडेवाढीची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. आता हा प्रस्ताव राज्य सरकारने परिवहन मंडळाकडे पाठवला आहे. तो उद्या मान्य होऊ शकतो.

त्यामुळे गुरुवारपासून दरवाढीचा निर्णय लागू होईल. ही दरवाढ किमान दीड ते 2 रुपयांची असेल. अर्थातच रिक्षाचे किमान भाडे आता 11 रुपये होणार आहे. तर टॅक्सीभाडेवाढेबाबत आठवडाभरात निर्णय होणार आहे.

गेल्या 6 वर्षांत रिक्षा चालकांना भाडेवाड मिळाली नसून ती एकत्रितपणे मिळावी, अशी रिक्षा चालकांची मागणी होती.पण या भाडेवाढीला ग्राहक संघटनांनी विरोध दर्शवला होता.

सीएनजीचे दर वाढले तरी रिक्षावाल्यांवर प्रत्येक किलोमीटरमागे फक्त 20 ते 25 पैशांचा, तर टॅक्सीचालकांवर प्रत्येक किलोमीटरमागे 45 पैशांचा बोजा पडणार आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी संघटनांनी मागीतलेली दरवाढ ग्राहकांना लुबाडणारी आहे, असे ग्राहक संघटनांचे म्हणणे आहे.

दरम्यान या संपाची हाक आपण दिली नसल्याचे कामगार नेते शरद राव यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबईच्या काही भागांमध्ये धाक दाखवून राणेंच्या स्वाभिमानी संघटनेने रिक्षा बंद केल्याचा आरोपही त्यांनी केला.

close