खते न मिळाल्याने गोदामांची तोडफोड

June 22, 2010 11:38 AM0 commentsViews:

22 जून

आधीच बेभरवशाचा निसर्ग आणि त्यातच दिवसेंदिवस वाढत चाललेली खतटंचाई, यामुळे बुलडाण्यातील शेतकर्‍यांचा आज संयमच सुटला. आणि त्यांनी खताच्या गोदामांची तोडफोड केली.

खत वाटप न करता साठवून ठेवल्यामुळे शेतकर्‍यांनी 10 गोदामांची तोडफोड करून 50 ते 60 लाखांचा खतांचा साठा उघड केला. ऐन पेरणीच्या वेळी व्यापारी खत आणि बी बियाणांचा कृत्रीम तुटवडा निर्माण करतात.

खताचे पोते बाजार भावापेक्षा जास्त दराने शेतकर्‍यांना विकतात. यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी आज ही गोदामेच फोडली.

नंदूरबारमध्ये रांगा

नंदूरबारमधील शहादा तालुक्यात रात्रीपासून शेतकर्‍यांनी खतांसाठी रांगा लावल्या आहेत. जिल्ह्यातील खताच्या एकूण वापरापैकी 70 टक्के वापर शहादा तालुक्यात होतो.

तालुक्यातून 50 हजार मेट्रीक टन खताची मागणी नोंदवण्यात आली होती. त्यापैकी फक्त 10 टक्के म्हणजे 5 हजार मेट्रीक टन खत उपलब्ध झाले आहे.

त्यामुळे खताची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांच्या मुलांना शाळा सोडून खतांच्या रांगेत उभे राहावे लागत आहे.

close