बेस्ट फाईव्हच्या खांद्यावरून राष्ट्रवादीचा काँग्रेसवर निशाना

June 26, 2010 2:12 PM0 commentsViews: 1

आशिष जाधव, मुंबई

26 जून

बेस्ट फाईव्हच्या गोंधळावरून राष्ट्रवादीने काँग्रेसच्या विरोधात आघाडी उघडली आहे. आपले सरकार तीन वेळा नापास झाल्याचा टोला आर. आर. पाटील यांनी काँग्रेसला लगावला आहे.तर महाराष्ट्राला फुलटाईम शिक्षणमंत्री हवाच, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

आधी पर्सेंटाईल, त्यानंतर 90:10 कोटा आणि आता बेस्ट फाईव्ह… अकरावी प्रवेशाचे हे तीनही फॉर्म्युले हायकोर्टात टिकले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारवर चहुबाजूने टीका होत आहे. बेस्ट फाईव्हच्या अपयशाच्या निमित्ताने शालेय शिक्षण खाते सांभाळणार्‍या काँग्रेसला शहाणपण शिकवण्याची नामी संधी राष्ट्रवादीने हेरली आहे.

याबाबत सरकारने जीआर न काढता अध्यादेश काढायला हवा होता आणि मग तो अधिवेशनात मंजूर करता आला असता. मिसहँडलिंग कुणी केले याचे उत्तर शिक्षणमंत्र्यांनी द्यायला हवे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस गुरूनाथ कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

अशा प्रकारे राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाहीत. या टीकेला उत्तर देताना काँग्रेसनेही राष्ट्रवादीला आघाडीचा धर्म शिकवण्याचा प्रयत्न केला आहे.

बेस्ट फाईव्ह प्रकरणी चुकून राज्यसरकारला सुप्रीम कोर्टातही अपयश आले, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जाहीरपणे आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू होईल हे वेगळे सांगायला नको.

close