भारत बंदची हाक

July 3, 2010 5:37 PM0 commentsViews: 5

अमेय तिरोडकर, मुंबई

4 जुलै

भाजपसह देशातील सगळ्या विरोधी पक्षांनी 5 जुलैला भारत बंदचे आवाहन केले आहे. हा बंद यशस्वी व्हावा यासाठी या पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. तर या बंदचा प्रभाव जाणवू नये यासाठी सरकारने कंबर कसली आहे.

मुद्दा आहे महागाईचा . लोकांच्या जीवनाचा . त्यामुळेच विरोधकांना हा प्रश्न आता तापवायचा आहे. काँग्रेसची देशावरची घट्ट राजकीय पकड महागाईवरून ढिली पडेल असा त्यांना अंदाज आहे. रेलरोको, रास्तारोको, मुख्य चौकांत निदर्शने असे नियोजन झाले आहे. देशातील बड्या उद्योगसमूहांनाही बंदचे आवाहन केले गेले आहे.

आधी सगळे उजवे. त्यांच्या साथीला डावे. डाव्यांच्या सोबत त्यांचे समाजवादी मित्र आणि या सगळ्यांच्या सोबत रिपब्लिकन पक्ष. महागाईच्या विरोधात जनतेला हाक मारण्याचे काम तरी या बड्या आघाडीने केले आहे. फक्त प्रश्न इतकाच आहे, जनता यांच्या हाकेला आपले मानते का…

एकीकडे विरोधकांनी बाह्या सरसावल्यात. तशा सरकारनेही. सगळ्यात काळजी आहे ती हिंसक घटनांची. बंदला बेबंद वळण लागू नये, असे आवाहन सरकारने केले आहे.

देश बंद झाला तर, विरोधकांचा विजय होईल. नाही तर, त्यांच्याच विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहील. जनता महागाईने त्रस्त आहेच. तरीही ती विरोधकांसोबत आली नाही, असे सगळे म्हणतील. या बंदमुळे खरी परीक्षा विरोधकांचीच आहे.

कोर्टात जाऊ नका

भारत बंद विरोधात कोर्टात न जाण्याचा सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कोर्टात जाणाच्या निर्णयाला चपराक बसली आहे. या निर्णयामुळे जनमत विरोधात जाण्याची शक्यता लक्षात घेत केंद्राने राज्य सरकारला ही सूचना केली आहे. मुख्यमंत्र्याच्या या निर्णयानंतर काँग्रेससह राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर नामुष्की ओढावली आहे.

भाजीपाला पोलीस बंदोबस्तात

बंदमुळे नवी मुंबईतून भाजीपाला मुंबईत पोलीस बंदोबस्तात पोहचवण्यात आला. भारत बंदच्या निमित्ताने सरकारनं ही पर्यायी उपाययोजना केली आहे. भारत बंदमुळे उद्याची भाजी आजच एपीएमसी मधून मुंबईत पाठवली गेली. पोलीस बंदोबस्तात 205 गाड्या भाजी मुंबईत पोहोचली.

नागपुरात तोडफोड

बंदच्या घोषणेचा परिणाम नागपूर शहरात रविवारीच बघायला मिळाला. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी शहरातील जगनाडे चैाक आणि गणेशपेठ भागात एसटी महामंडळाच्या बस वर दगडफेक केली. या घटनेनंतर कार्यकर्ते लगेच फरार झाले. पोलिसांनी या घटनेनंतर लगेच शहरात बंदोबस्त वाढवला.

मुंबईत मोठा बंदोबस्त

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठा बंदोबस्त असणार आहे. या बंदोबस्तासाठी शहरात मोठा फौजफाटा दाखल झाला आहे. शहरात सुमारे 50 हजार पोलिसांपैकी 40 हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असतील. राज्य राखीव दलाच्या 11 कंपन्याही बंदोबस्तात लावल्या गेल्या आहेत. रॅपिड ऍक्शनच्या तीन कंपन्या तर 39 कॉम्बॅक्ट व्हॅन रस्त्यावर असणार आहे. सुमारे दोन हजार हत्यारी पोलीस रस्त्यावर असणार आहेत. तर दंगल विरोधी पथकाच्या तीन प्लॅटून बंदोबस्तावर असणार आहेत. पाच क्विक रिन्स्पॉन्स टीम बंदोबस्तावर असणार आहे.

टॅक्सी बंद राहणार

बंदच्या पार्श्वभूमीवर टॅक्सीमेन असोसिएशनने आज रात्री 12 पासूनच टॅक्सी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. बंदच्या दरम्यान टॅक्सीचं नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला, असे टॅक्सीमेन असोसिएशनचे अध्यक्ष ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले.

close