महागाईविरोधात राज्यभर आंदोलन

July 5, 2010 8:30 AM0 commentsViews: 6

5 जुलै

महागाईविरोधातील बंदला राज्यभर उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

औरंगाबादमध्ये क्रांती चौकातील पेट्रोलपंपावर भारत बंदच्या निमित्ताने निदर्शने करताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि प्रकाश महाजन यांना अटक करण्यात आली. तत त्यावरून खासदार चंद्रकांत खैरे यांची पोलिसांशी बाचाबाची झाली.

कोल्हापुरात आंदोलन

भारत बंदसाठी कोल्हापुरातही आंदोलन सुरू आहे. भारत बंद आंदोलन करणार्‍या श्रमिक कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी बंदुकीचा धाक दाखवून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला.

सांगली फाट्यावर श्रमिक कामगार संघटनेचे कार्यकर्ते रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी आले होते. पण त्यापूर्वीच पोलिसंानी त्यांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली. मात्र या दडपशाहीला न जुमानता आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे कामगारांनी पोलिसांना ठणकावून सांगितले.

त्यावेळी करवीरचे पोलीस उपअधिक्षक जयवंत देशमुख यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून कामगारांना अटक करण्यास सुरूवात केली. त्यामुळे कामगारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली.

नाशिकमध्ये काँग्रेस ऑफिसवर हल्ला

नाशिकमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नाशिकच्या काँग्रेस ऑफिसवर हल्ला केला. या कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींच्या पोस्टरवर चिखलफेकही केली.

नांदेडमध्येही उत्स्फुर्त बंद पाळण्यात आला. महिलांनी इथे अनोखे आंदोलन केले. त्यांनी रस्त्यावरच स्वयंपाक करून महागाईचा निषेध केला.

हिंगोलीतही भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांच्या नेतृत्वाखली कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरात मार्केट, शाळा, कॉलेज, बस, रिक्षा, बंद ठेवण्यात आल्या.

वर्ध्यात हायवे रोखला

वर्धा इथे नागपूर-अमरावती हायवेवर तळेगावजवळ बसेस रोखण्यात आल्या. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश लुंगे यांच्यासह 100 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

close