राज्यात बंद यशस्वी

July 5, 2010 2:51 PM0 commentsViews: 2

5 जुलै

विरोधी पक्षांनी पुकारलेला बंद आज राज्यात यशस्वी झाला. नाशिक, पुणे आणि कोल्हापूरमध्ये काही प्रमाणात हिंसक घटना घडल्या. पण एकंदरीत बंद शांततेत पार पडला.

पुण्यात 85 बसेसचे नुकसान

पुण्यात बंदची सुरुवात झाली ती, पुणे- मुंबई एक्सप्रेस हायवेवर भाजप- शिवसेनेने केलेल्या रास्ता रोकोने. पिंपरीमध्ये शिवसेनेने रेल रोको केला.

भाजप नेते एकनाथ खडसेंनी धरणे आंदोलन केल्यानंतर त्यांच्यासह 100 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवसेनेच्या नीलम गोर्‍हेंनी घोषणाबाजी करून आंदोलन केले. तर मनसेने महागाईच्या विरोधात रॅली काढली. बंदमुळे रस्त्यांवर शुकशुकाट होता. दरम्यान एक बसची जाळपोळ करण्यात आली तर दगडफेकीत 85 बसेसचे नुकसान झाले.

कोल्हापूरमध्ये पोलिसांची अरेरावी

कोल्हापूरमध्ये श्रमिक कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी बंदुकीचा धाक दाखवून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. यामुळे कामगारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली.

नाशिकमध्ये तावडेंना अटक

नाशिकमध्ये भाजप, शिवसेना, मनसे आणि डाव्या पक्षांनी निदर्शने केली. भाजपचे प्रदेश सरचिटणीस विनोद तावडेंसह दीडशे कार्यकर्त्यांना अटक झाली. कार्यकर्त्यांनी बसेसवर दगडफेक केली तर नाशिकच्या काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला.

सोनिया गांधींच्या पोस्टरवर चिखलफेक केली. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप कार्यकत्यांर्मध्ये चांगलीच जुंपली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा जाळला. तर शिवसैनिकांनी सोनियांचा प्रतिमेची जाळपोळ केली.

औरंगाबादमध्ये खैरेंना अटक

औरंगाबादमध्ये मुख्य बाजारपेठेत कडकडीत बंद होता. यामुळे बस सेवा, पेट्रोल पंप बंद पडले. बंदच्या काळात शिवसेनेचे ़खासदार चंद्रकांत खैरेंसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली.

भाजप नेते पांडुरंग फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तर डाव्या आघाडीने रेल रोकोचा प्रयत्न केला. औरंगाबादसह मराठवाड्यात हा बंद यशस्वी झाला.

नागपुरात व्यवहार ठप्प

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची हेडक्वार्टर असलेल्या नागपूरमध्येही बंदमुळे सगळे व्यवहार ठप्प होते. बस, रिक्षाची वाहतूकही बंद होती. सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेजांमध्येही शुकशुकाट होता.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. अमरावतीमध्ये शिवसैनिकांनी विदर्भ एक्सप्रेससमोर रास्ता रोको केला.

close