मुंबईत बंदला मोठा प्रतिसाद

July 5, 2010 3:04 PM0 commentsViews: 3

5 जुलै

आजच्या बंदला मुंबईत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. नेहमीप्रमाणे आंदोलकांनी सगळ्यात आधी टार्गेट केले ते लोकल आणि बेस्टच्या बसेसना. पण मुंबईच्या या दोन्ही लाइफलाईन दिवसभर सुरळीत होत्या. आणि विशेष म्हणजे आज दिवसभर बसेस आणि लोकल रिकाम्याच होत्या. कारण मुंबईकरांनी आज घरीच बसणे पसंत केले.

रिकाम्या गाड्या

रिकाम्या लोकल, रिकाम्या बसेस, एसटीच्या बसेस डेपोतच उभ्या, एरवी वर्दळीनं गजबजलेली चर्चगेट, सीएसटी स्टेशन्स, फोर्टसारख्या भागात शुकशुकाट….सोमवारी दिवसभर मुंबईत असे चित्रे होते. कारण होते, महागाईविरोधात भाजप, शिवसेना, मनसे आणि डाव्या पक्षांनी पुकारलेल्या बंदचे. या बंदला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत लाखो मुंबईकरांनी घरी राहणेच पसंत केले. तर जे लोकलने निघाले होते त्यांनीही या बंदचे समर्थन केले.

नवी मुंबईत कडकडीत बंद

नवी मुंबईत तर कडकडीत बंद पाळण्यात आला. इथं भाजपच्या 100 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या बंदला हिंसक वळण तसे रविवारी रात्रीच लागले. ठाण्यात रात्री बारा वाजल्यानंतरही बस सुरू ठेवल्याने बसेस आणि रिक्षांची तोडफोड करण्यात आली.

मग बेस्टच्या बसवर हल्ल्यांचे प्रकार सकाळ होताच वाढले. कांजुरमार्गमध्ये एक तर जोगेश्वरीमध्येही एका बसची तोडफोड करण्यात आली. तर सुमारे 80 बसेसवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत बसचे 7 कंडक्टर आणि ड्रायव्हर जखमी झाले.

लोकल रोखण्याचा प्रयत्न

एकीकडे बस रोखण्याचा प्रयत्न सुरू असतानाच बोरीवलीत शिवसैनिकांनी लोकल रोखण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेत लोकलसेवा पुन्हा सुरळीत केली. रोज हजारो गाड्यांची ये-जा असणार्‍या सी लिंकवरही आज शुकाशुकाट होता.

भाजप नेत्यांना अटक

तिकडे भाजपच्या नेत्यांची निदर्शने सुरूच होती. मुलुंडमध्ये निदर्शने करणार्‍या किरीट सोमय्यांना अटक करण्यात आली. तर अंधेरीत गोपीनाथ मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.तिकडे शिवसेनेचे जोशीसरही आंदोलनात उतरले. त्यांनाही अटक झाली.

मनसे मैदानात

या सगळ्या गदारोळात दिवसभर शांत असलेले मनसेचे नेते आणि कार्यकर्ते दुपारनंतर मैदानात उतरले. दादरमध्ये आंदोलन करणार्‍या आमदार बाळा नांदगावकर यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

एकूणच मुंबईत बेस्टच्या रिकाम्या बस आणि ऑफिस टायमिंगमध्येही रिकाम्या धावणार्‍या लोकलच्या दृश्यांनी हा बंद यशस्वी झाला असेच म्हणता येईल.

close