देशभरात बंद यशस्वी

July 5, 2010 3:16 PM0 commentsViews: 3

5 जुलै

दिल्लीसह देशभरात आजचा बंद यशस्वी झाला. नवी दिल्लीत भाजपने रॅली काढली. तर काही ठिकाणी आंदोलकांवर लाठीमारही झाला. एकूण बंदमुळे देशभरातील जनजीवन विस्कळीत झाले.

गडकरी, यादवांना अटक

राजधानी दिल्लीत भाजपने चांदणी चौकात रॅली काढली. भाजपचे नितीन गडकरी, राजनाथ सिंग, जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांना अटक करून सोडण्यात आले.

त्याशिवाय इतर अनेकजणांना ताब्यात घेण्यात आले.भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी लोकांना उद्देशून भाषण केले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील मुख्य रस्ते अडवले. डाव्या पक्षांनीही दिल्लीत रॅली काढली.

पाटण्यात हिंसक वळण

पाटण्यात बंदला हिंसक वळण लागले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी रिक्षा आणि मोटरसायकलना लक्ष्य केले. त्यांनी रेल्वेसेवाही विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या.

लखनौमध्ये लाठीमार

लखनौमध्ये अरुण जेटली आणि मुख्तार अब्बास नक्वी यांना अटक करून सोडण्यात आले. समाजवादी पक्ष आणि भाजपच्या अनेक नेत्यांवर लाठीमार करण्यात आला. दुकानदारांनी बंदला मोठा प्रतिसाद दिला.

अहमदाबाद विस्कळीत

अहमदाबादमध्ये लोकांनी मोर्चा काढला. सरकार आणि महागाईविरोधात त्यांनी घोषणा दिल्या. सार्वजनिक वाहतूक सेवा विस्कळीत झाली. शाळा, कॉलेज आणि दुकानं पूर्णपणे बंद होती. सुरतमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी जबरदस्तीनं दुकानं बंद पाडण्याचा प्रयत्न केला.

कोलकात्यात बंदचा फटका

कोलकातावासियांना बंदचा मोठा फटका बसला. कोलकाता एअरपोर्टवरच्या अनेक फ्लाईट रद्द करण्यात आल्या. लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेगाड्या ठप्प झाल्या. रस्त्यावरची वाहतूक बंद होती.

केरळमध्ये शुकशुकाट

डाव्यांच्या केरळमध्ये बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. बहुतांशी रस्त्यांवर शुकशुकाट होता. दुकानं, शाळा, कॉलेजं बंद होती.

बंगळुरूमधील कंपन्या बंद

बंगळुरूमध्ये विप्रो, इन्फोसिस या कंपन्यांचे ऑफीस आणि बँका बंद होत्या. शाळा, कॉलेजना आज सुट्टीच होती. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीच घोषणाबाजी केल्याने विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. रेल्वे वाहतूक उशिरा सुरू होती.

हैदराबादमध्ये संमिश्र प्रतिसाद

पण हैदराबादमध्ये मात्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बससेवा सुरळीत सुरू होती. काही रिक्षा संघटनांनी बंदला पाठिंबा दिला. खासगी शाळा-कॉलेजं बंद होती. विमानसेवा मात्र सुरळीत होती.

close