खैरलांजीतील आरोपींना जन्मठेप

July 14, 2010 4:05 PM0 commentsViews: 19

प्रशांत कोरटकर, नागपूर

14 जुलै

चार वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्याच्या खैरलांजी गावात भोतमांगे कुटुंबाचे हत्याकांड घडले होते. भंडार्‍याच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने 6 जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र हायकोर्टाने त्यांना फाशीऐवजी 25 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हायकोर्टाच्या या निकालावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

खैरलांजी प्रकरणातील आरोपींना कोर्टाने फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गोपाल बिंजेवार, सकरू बिंजेवार, शत्रुघ्न धांडे, विश्वनाथ धांडे ,रामू धांडे, जगदीश मंडलेकर, शिशुपाल धांडे आणि प्रभाकर मंडलेकर या 8 आरोपींना ही 25 वर्षांची जन्मठेप सुनावण्यात आली.

निकाल ऐकताच या दुर्घटनेतील पीडित भैय्यालाल भोतमांगे पाणावलेल्या डोळ्याने कोर्टाबाहेर पडले…

निकालाच्या वेळी कोर्टाबाहेर प्रचंड बंदोबस्त होता. दलित संघटनांचे नेतेही होते. निकालामुळे त्यांच्यात संतापाची भावना आहे. खैरलांजी घटनेची चौकशी सीआयडीनंतर सीबीआयला सोपवण्यात आली होती. पण या दरम्यान सीबीआयला फारसे पुरावे गोळा करता आले नाहीत, अशी टीका सीबीआयवर होत आहे. पण सीबीआयच्या वकिलांना हे मान्य नाही.

खैरलांजीच्या घटनेचा निकाल लागला पण न्याय मिळाला नाही, अशी या घटनेतील पीडितांची भावना आहे. त्यामुळे न्यायासाठी त्यांना सुप्रीम कोर्टाची दारे ठोठवावी लागणार आहेत.

या निकालातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक नजर टाकूया…

- फास्ट ट्रॅक कोर्टानं 6 जणांना दिलेली फाशीची शिक्षा रद्द

- फाशीच्या शिक्षेचं 25 वर्षांच्या जन्मठेपेच्या शिक्षेत रुपांतर

- दोन जणांची जन्मठेप कायम ठेवली

- ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्याखाली शिक्षा देण्याचा सीबीआयचा अर्ज फेटाळला

- हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ नाही, असे कोर्टाने म्हटले

- आरोपी निर्दोष आहेत, हा बचाव पक्षाचा युक्तिवाद फेटाळला

- फाशीच्या शिक्षेसाठी सीबीआयकडे ठोस पुराव्यांची कमतरता

close