कोकणात मुसळधार

July 22, 2010 1:19 PM0 commentsViews: 19

22 जुलै

कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. खेड शहरात जगबुडी नदीचे पाणी शिरले आहे.200 ते 250 दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. खेड, दापोली आणि मंडणगड मार्गावर नारंगी नदीचे पाणी भरल्याने तेथील वाहतूकही ठप्प झाली आहे.

दापोली तालुक्यातही जालगाव भागात पाणी भरल्याने तेथील 15 कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे. आजच्या पावसामुळे 125 वर्षांची जुन्या शाळेची भिंत कोसळली. सुदैवाने यातून विद्यार्थी बचावले. दापोली आणि मंडणगड तालुक्यातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे अंतर्गत गावांचा संपर्क तुटला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. कुडाळमधील वालावल गावात पुराचे पाणी भरून येथील दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सिंधुदुर्गातून जाणार्‍या मुंबई-गोवा हायवेवरील पीटढवळ पुलावर वारंवार पुराचे पाणी येत असल्याने हायवेवरची वाहतूक खंडीत होत आहे.

कणकवली तालुक्यातील वरवडे भागातही पाणी भरले आहे. तसेच दोडामार्ग तालुक्यात छोट्या पुलांवरून पाणी जात असल्याने अनेक वाड्यांचा संपर्क तुटला आहे.

कोकण रेल्वे विलंबाने

कोकण रेल्वे मार्गावर राजापूरपासून 3 किलोमीटरवर गोपाळवाडी बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. कोकण रेल्वेच्या गाड्या सुमारे 3 तास उशिराने धावत आहेत. तसेच कोकण रेल्वेच्या निवसर स्टेशनजवळ प्लॅटफॉर्मला आणि रूळाखालच्या जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत.

त्यामुळे रेल्वे ट्रॅक खचला असून कोकण रेल्वेचा वेग या भागात ताशी 10 किलोमीटर इतका ठेवण्यात आला आहे. या ट्रॅकच्या दुरूस्तीचे काम जोरात सुरू आहे. आता वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.

पाऊस दोन दिवस राहणार

कोकणात सध्या सुरू असलेला पाऊस पुढचे दोन दिवस कायम राहणार असल्याचे पुणे वेधशाळेने म्हटले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तरच राज्यातील इतर भागात पाऊस वाढेल, असे पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी म्हटले आहे.

close