कोकणात पावसाचे 2 बळी

July 24, 2010 12:32 PM0 commentsViews: 5

24 जुलै

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं चांगला जोर धरला आहे, तर रत्नागिरीसह कोकणाला चांगलंच झोडपलं आहे.

गुहागर इथं दहा वर्षांच्या मुलीचा पावसात पाय घसरून मृत्यू झाला. ती शाळेतून घरी परतत होती. तर खेड तालुक्यातल्या तुंबाड गावात जगबुडी नदीच्या पात्रात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला.

खेड-दापोली महामार्ग ठप्प झाला. नारंगी नदीच्या पुलावर एकवीरानगर इथं चार फूट पाणी साचलं आहे. तर जगबुडी नदीचं पाणी पुन्हा खेड शहरात शिरल्यानं बाजारपेठेचे काम ठप्प झाले आहे. रत्नागिरीतल्या सोमेश्वरमधल्या मुस्लिम भागात दीडशे घरांमध्ये पाणी भरले. काजळी नदीला पूर आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली.

काजरघाटीत 6 घरांना स्थलांतरित करण्यात आले आहे. दरम्यान, संगमेश्वर इथल्या बाव नदीने धोक्याची पातळी ओलांडली. सध्या भरती असल्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली.

कोल्हापुरात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे 20 गावांचा संपर्क अंशत: तुटला. जिल्ह्यातील पंधरा बंधार्‍यांवर पाणी आल्याने या गावांचा संपर्क तुटला. जिल्ह्यातील सात मार्ग बंद झाले आहेत तर अनेक नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी गेल्या दोन दिवसांत तब्बल 11 फुटांनी वाढली. त्यामुळे आता पंचगंगेची पातळी 31 फुटांपर्यंत पोहोचली.

पंचगंगेची इशारा पातळी 39 फुटांवर आहे, तर धोक्याची पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यात 24 तासांत 695 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात 212 मिलिमीटर इतका झाला तर सर्वाधिक कमी पावसाची नोंद शिरोळ तालुक्यात 7 मिलिमीटर इतकी झाली.

close