आठवण 26 जुलैची…

July 26, 2010 1:29 PM0 commentsViews: 164

26 जुलै

26 जुलै 2005….आजही या दिवसाच्या आठवणीने अंगावर शहारे येतात… मुंबई आणि परिसरातील या घटनेला आज 5 वर्षे पूर्ण झाली. त्या दिवशी न भूतो… असा पाऊस कोसळला… 2 तासात अख्खी मुंबई जलमय झाली.

आधीच ढगफुटी आणि त्यात समुद्राला आलेली भरती… त्यामुळे मुंबई पाण्याखाली गेली. मिठी पात्र सोडून मन मानेल तसे वाहत होती… आणि मुंबईकरांना त्याचे फटकारे बसत होते. पण या संकटाच्या वेळीही मुंबईकर खचले नाहीत… लोकल्स, बसस्टॉप, स्टँड्स जागा मिळेल तिथे लोकांनी आसरा घेतला होता. कित्येकजण धड घरीही पोहोचू शकले नव्हते… घरच्यांशी संपर्क होत नव्हता…

अशावेळी स्वत: अडचणीत असूनही मुंबईकर धावला…अडकलेल्या महिला, वृद्ध, लहान मुलांसाठी त्याने भरभरून मदत केली. लहानग्यांना दूध, भुकेलेल्यांना जेवण पुरवलं आणि धीरही दिला… केवळ दोरखंडांची मदत घेऊन नागरिकांचे प्राण वाचवले… मुंबईच नव्हे, तर उपनगरांसहित ठाणे आणि परिसरही जलमय झाले होते… 26 जुलैच्या आठवणीने मुंबईकर अस्वस्थ होतो…मात्र रोजच्या जगण्यातील जबरदस्त संघर्षाने त्याचे सच्चा मुंबईकर होऊन निसर्गाशी झुंज देणे पुन्हा पुन्हा अधोरेखित होत राहते…

महापालिकेचे दुर्लक्ष

मात्र असे असले तरी, मिठी नदीच्या रुंदीकरणाकडे मुंबई महापालिकेचे दुर्लक्षच आहे. जलप्रलयाचा मोठा फटका मुंबईने अनुभवला आहे. त्यासाठी प्रदूषणासोबतच नदीपात्रात होणारी अवैध बांधकामेही कारणीभूत आहेत.

पर्यावरणवाद्यांनी वारंवार इशारे दिले. पालिका प्रशासनाने दाखवण्यापुरते तेवढे पात्र रुंदीकरण केले. मात्र नंतर 'पुन्हा जैसे थे'च… त्यामुळेमनपा पुन्हा एकदा मोठा जलप्रलय होण्याची वाट पाहतेय काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

26 जुलै व्हावा सुरक्षा दिन…

मुंबईत 26 जुलै रोजी झालेल्या जलप्रलयामुळे शेकडो लोक मृत्यूमुखी पडले होते. 26 जुलै रोजी मुंबई आणि राज्याच्या इतर भागातही जलप्रलयामुळे हाहा:कार उडाला होता. राज्यभरात सुमारे हजारावर बळी या जलप्रलयामुळे गेले होते.

त्यामुळे सव्वीस जुलै हा पूर सुरक्षा दिन म्हणून घोषित व्हायला हवा, असे मत जलतज्ञ माधवराव चितळे यांनी व्यक्त केले आहे. पूर सुरक्षा दिनामुळे पूरग्रस्त भागात जनजागरण आणि उपाययोजना करण्यास त्यामुळे मदत होऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

close