कोकण रेल्वेच्या संकटात भर

July 26, 2010 2:39 PM0 commentsViews: 29

26 जुलै

या पावसाळ्यात कोकण रेल्वेच्या मार्गात आलेली संकटे काही दूर होण्याची चिन्हे दिसत नाहीत. निवसर स्टेशनचा ट्रॅक खचलेला असतानाच आता याच स्टेशनजवळच्या कोंडवी बोगद्यावरचा डोंगराचा भाग खचला आहे.

या डोंगराला मोठ्या प्रमाणावर लांब आणि खोल भेगा पडल्यात. वरची मातीही बोगद्याजवळ कोसळू लागल्याने धोका निर्माण झाला आहे. गेल्या 3 दिवसांतील ही तिसरी घटना आहे. इथे आता दुरुस्तीचे काम सुरू आहे.

कोचरी गावात डोंगर खचला

दरम्यान, कोचरी गावातही डोंगर खचला आहे. त्यात तीन एकर भातशेती मातीखाली गाडली गेली आहे. तसेच वेरवली-बुद्रुक या गावात घरांवर मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली आहेत.

दरड काढण्याचे काम सुरू

कोकण रेल्वे मार्गावर काल आसोडे गावाजवळ कोसळलेली दरड बाजूला काढण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. यासाठी तब्बल 12 मशीन्स आणि 15 डंपर लावण्यात आले आहेत.

मात्र जवळपास 25 हजार क्युबिक टन इतकी मोठ्या प्रमाणात माती रुळांवर आल्याने ती उचलण्यासाठी किमान चार दिवस तरी लागतील, असे समजते. येत्या दोन ते तीन दिवसात ही माती बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे कोकण रेल्वेने ठरवले आहे. पण पावसाच्या व्यत्ययामुळे या कामाला वेळ लागत आहे.

वेरवली गावाला वादळाचा फटका

रत्नागिरी जिल्ह्यातील वेरवली गावाला वादळाचा फटका बसला आहे. वेरवलीतील 10 ते 15 घरांवर झाडे कोसळून घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वादळाच्या वेळी घरातील माणसे बाहेर पडल्याने सुदैवाने जिवीत हानी टळली. ग्रामस्थांनी प्रशासनाला ताबडतोब कळवूनही आज दुपारपर्यंत प्रशासनाचे कुणीही अधिकारी या भागात फिरकलेले नाहीत. पावसाचे प्रमाणही या भागात वाढले आहे.

पावसाचे जोर कायम राहणार

येत्या 36 ते 48 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी दिली आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हा पाऊस सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 48 तासांनंतर मात्र पावसाचा जोर कमी होईल, असेही त्या म्हणाल्या आहेत.

close