अमित शाह अडचणीत

July 26, 2010 5:46 PM0 commentsViews: 3

26 जुलै

गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री अमित शाह यांच्या गळ्याभोवतीचा फास आज आणखी आवळला गेला. एन. के. अमीन नावाच्या एका माजी पोलीस अधिकार्‍याने अमित शाह यांच्या विरोधात साक्ष देण्याची तयारी दाखवली. तर दुसरीकडे अमित शाह यांना वैतागलेल्या अहमदाबादमधील दोन बड्या बिल्डर्सनीसुद्धा सीबीआयकडे धाव घेतली.

सोहराबुद्दीन शेख बनावट आणि त्याची पत्नी कौसर बी या दोघांच्या खून प्रकरणी गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री अमित शाह अटकेत आहेत. आणि त्यांच्यासमोरच्या समस्या आता वाढल्या आहेत. कारण एके काळी त्यांच्या हाताखाली काम करणारे एक वरिष्ठ पोलिस अधिकारी आता त्यांच्या विरोधात साक्ष देणार आहेत. सोहराबुद्दीन प्रकरणातले आरोपी एन के अमीन आता माफीचे साक्षीदार झालेत.

दरम्यान, अमित शाह यांना आणखीन एक मोठा धक्का बसलाय. रमण पटेल आणि दशरथ पटेल या अहमदाबादेतल्या दोन बड्या बिल्डर्समधील संवादाच्या टेप्स सीबीआयच्या हातात पडल्या आहेत. सोहराबुद्दीनचे जिवंत राहणे आपल्याला परवडणारे नाही, असे अमित शाहने आपल्याला सांगितल्याचे या दोघांनी सीबीआयला सांगितले. या टेप्स आयबीएन नेटवर्कच्या हाती लागल्या आहेत.

दरम्यान, अमित शहा यांच्या जामीन अर्जाची सुनावणी आता 2 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. याचाच अर्थ अमित शाह यांना आता पुढचे सात दिवस जेलमध्ये राहावे लागेल. अमित शहा यांची तुरुंगात चौकशी करण्याची परवानगी सीबीआयला कोर्टाकडून मिळाली आहे. सीबीआयने चार्जशीटची कॉपी दिल्याशिवाय अमित शाह यांची चौकशी करता येणार नाही, असा युक्तिवाद अमित शाह यांच्या वकिलांनी केला आहे.

अमित शाह यांच्या गळ्याभोवतीचा फास सीबीआयने आवळायला सुरुवात केली आहे. आता गुजरात पोलिसांतील आणखी काही बड्या अधिकार्‍यांना अटक होण्याची शक्यता आहे.

सोहराबुद्दीन शेख बनावट एन्काऊंटर प्रकरणात एन. के. अमीन यांची साक्ष कशी महत्त्वाची आहे ते पाहूया…

सोहराबुद्दीन शेख याची हत्या झाली त्यावेळी एन. के. अमीन हे डीएसपी होते.

ज्या फार्महाऊसमध्ये सोहराबुद्दीनची पत्नी कौसरबीला ठेवले होते, तिथेही अमीन उपस्थित होते.

सोहराबुद्दीन आणि कौसरबी यांच्या बनावट एन्काऊंटरच्या वेळी अमीन उपस्थित होते.

या एन्काऊंटर प्रकरणात अमीन स्वत: एक आरोपी आहेत.

त्यांना डीआयजी रजनीश राय यांनी याप्रकरणी अटकही केली होती.

25 ते 29 नोव्हेंबर 2005 या दरम्यान नेमके काय घडले, याची तपशीलवार माहिती अमीन देऊ शकतात.

या एन्काऊंटरमधील मुख्य आरोपी पोलीस अधिकारी वंझारा यांच्या अमीन हे अतिशय जवळचे आहेत.

गडकरींचा आरोप

दरम्यान, सोहराबुद्दीन प्रकरणी यूपीए सरकार सीबीआयचा गैरवापर करत आहे, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला आहे.

close