करकरेंच्या मृत्यूची नवी माहिती

July 27, 2010 3:43 PM0 commentsViews: 10

27 जुलै

अमेय तिरोडकर, मुंबई

मुंबई हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबत एक नवी माहिती आज पुढे आली. करकरेंचा मृत्यू हा खांद्याला लागलेल्या गोळ्यांमुळेच झाला, असे भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यानिशी सभागृहात सिद्ध केले. बुलेटप्रूफ जॅकेटच्या फाईलमधील पहिली 29 पाने गायब असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात कसाब आणि त्याच्या साथीदाराच्या गोळीबारात हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला…त्यानंतर वाद सुरू झाला तो…करकरे यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटचा…जॅकेट भेदून गोळी गेलीच कशी, या प्रश्नावर सरकारचे उत्तर होते, करकरेंचा मृत्यू मानेला गोळ्या लागल्यामुळे झाला! पण आज देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सरकारचा दावा खोटा ठरवणारा पुरावाच सादर केला. त्यात करकरेंच्या खांद्यालाच गोळ्या लागल्याचे स्पष्ट लिहिले आहे.

करकरेंना दिलेल्या बुलेटप्रूफ जॅकेटच्या खरेदीबद्दलच मोठा वाद आहे. एका रिपोर्टनुसार एके-47, 7.62 रायफल, 9 एमएम कार्बाईन अशा तीन प्रकारच्या बंदुकीसाठी हे जॅकेट पूर्णपणे अनफीट आहे. तरीही पोलिसांना हे जॅकेट दिले जाते आणि माहिती दाबली जाते. यावरून नागपूर अधिवेशनात सरकारवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणू, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

संपूर्ण अधिवेशनात विरोधकांवर बाजी उलटवण्यास सरकार यशस्वी झाले. मात्र शेवटी करकरेंच्या जॅकेटचा मुद्दा पुराव्यासह उपस्थित करून विरोधकांनी सरकारला अडचणीत आणले आहे.

close