मालेगावातील मृत गाई प्रकरणातील सत्य उजेडात

July 27, 2010 5:03 PM0 commentsViews: 2

दीप्ती राऊत, नाशिक

27 जुलै

मालेगावमधील मृत गाई प्रकरणाची सत्यता अखेर उजेडात आली आहे. या प्रकरणी मुंबईचा व्यापारी जुबेर कुरेशीला अहमदनगरमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याला 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

जनावरांच्या बेकायदेशीर वाहतूकीतून हा प्रकार घडला असल्याचे 'आयबीएन-लोकमत'ने दुसर्‍याच दिवशी मांडले होते. कुरेशीच्या अटकेनंतर ही बाब प्रत्यक्षच सिद्ध झाली.

21 जुलैला मालेगाव-मनमाड चौफुलीजवळ मेलेल्या गाई आढळल्या आणि राज्यभर तणावाचो वातावरण निर्माण झाले. याचा संबंध एकादशीशी जोडून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, जनावरांच्या बेकायदेशीर वाहतुकीतूनच हा प्रकार झाल्याचे आता सिद्ध झाले आहे.

जनावरांचा मोठा व्यापारी असलेल्या जुबेर कुरेशीच्या पोलीस शोधात होते. नगरमध्ये तो असल्याची माहिती कुरेशी समाजातून मिळाली. त्यानुसार त्याला अटक केली गेली. कुरेशीने मध्य प्रदेशमधील जबू झावरा या व्यापार्‍याकडून जनावरे खरेदी केली होती. एका ट्रकमध्ये 42 जनावरे कोंबून नेताना त्यातील 8 गाई दगावल्या.

कुरेशीने मेलेल्या गाई खरेदी न करता परत पाठवल्या. परतीच्या वाटेवर गाडीच्या ड्रायव्हरने त्या वाटेत टाकून दिल्या. त्या मालेगावजवळच का टाकल्या, याचा तपास ड्रायव्हरपर्यंत पोहोचल्यावर लागेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. धार्मिक भावना चिथावण्यासाठी गाई मारण्यात आल्या नाहीत, तर जनावरांच्या बेकायदेशीर वाहतुकीमुळे त्या मेल्याचे अखेर उघड झाले आहे.

close