मुंबईत मलेरियाचे थैमान

July 28, 2010 3:15 PM0 commentsViews: 2

29 जुलै

मुंबईमध्ये सध्या मलेरियाचे थैमान सुरु आहे. गेल्या एक महिन्यात एक लाख लोकांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले. त्यातील 12 हजारे नमुने हे मलेरिया पॉझिटीव्ह असल्याचे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांनी सांगितले.

तसेच मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये संध्याकाळीही ओपीडी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय नगरसेवकांच्या मदतीने आरोग्य शिबिरेही अनेक वार्डात घेतली जात असल्याची माहिती मनिषा म्हैसकर यांनी दिली.

झोपडपट्टी परिसरात राहणारे आणि बांधकामाच्या ठिकाणी राहणारे लोक मोठ्या प्रमाणावर मलेरियाने त्रस्त आहेत. अशा अडीच हजार मजुरांना महापालिका हेल्थ कार्ड देणार आहे.

दरम्यान बांधकामाच्या ठिकाणी धूर फवारणी आणि किटक नाशकांची फवारणी न करणार्‍या सहा बिल्डर्सवर महापालिकेने कारवाई केली आहे.

मुंबईत प्रामुख्याने अंधेरी, घाटकोपर, कुर्ला, किंग्ज सर्कल, दादर, परळ, भायखळा या भागांमध्ये मलेरियाचा फैलाव झाला आहे.

मुंबईत एकीकडे मलेरियासारख्या साथीच्या रोगांनी थैमान घातले असताना महापालिकेचे अधिकारी मात्र गटार आणि कचरा यांच्या सफाईसंदर्भात गंभीर असल्याचे दिसत नाहीत. तरीही शहरात अनेक ठिकाणी गटारांची सफाई व्यवस्थित न झाल्यानं दुर्गंधी पसरली आहे. याचाच फटका नागरिकांना बसत आहे.

close