कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा वेढा

July 29, 2010 10:08 AM0 commentsViews: 3

29 जुलै

कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर होत आहे. जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतली असली तरी पूरस्थिती जैसे थे आहे. राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यातून 14 हजार क्युसेक्स पाणी सोडले जात आहे.

धरणाचा मुख्य दरवाजाही 4 फुटांपर्यंत उघडण्यात आला आहे. फेजीवडे गावाच्या गावकर्‍यांना केंद्रीय विद्यालय आणि एमएसईबीच्या परिसरात हलवण्यात आले आहे.

पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नदीची राजाराम बंधार्‍यावरची पाणी पातळी 42 फूट 1 इंच इतकी झाली आहे. पंचगंगेची धोका पातळी 43 फूट इतकी आहे.

अजूनही 52 गावांचा संपर्क अंशत: तुटला आहे. त्यामुळेकोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील केर्ली इथे पाणी आले आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. महापुराचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील गावांना बसतो.

या तालुक्यातील सात गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला असला तरी या गावांना पर्यायी मार्गांने वाहतूक सुरू आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होताना दिसत आहे. चांदोली धरणातून 7 हजार 96 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

close