वाशिममध्ये पीक विम्याचा बोजवारा

July 29, 2010 11:12 AM0 commentsViews: 2

मनोज जयस्वाल, वाशिम

29 जुलै

वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय पीक विमा योजनेचा बोजवारा उडाला आहे. जिल्ह्यातील 1 कोटी 40 लाख रुपयांचा हप्ता भरला गेला. शेतकरी मात्र विमा योजनेपासून अजूनही वंचित आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये रोष पसरला आहे.

कर्जाच्या पैशातूनच बँक विम्याचे पैसे कापत आहे. त्यातच सोयाबीनवरील लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. सरकारने सर्व्हे करून मदतीचे आश्वासनही दिले. हे पैसे खरीप पेरणीपूर्वी मिळणे अपेक्षीत होते. मात्र अजूनही पैसे मिळालेलेच नाहीत. विदर्भात वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांची ही स्थिती आहे.

जिल्ह्यातील 5 लाख शेतकर्‍यांनी पीक विम्याचे हफ्ते भरले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून या विम्यापोटी जिल्हा प्रशासनाकडे 17 कोटींची रक्कम जमा झाली आहे. आता दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी जिल्हा प्रशासनाने पैशांचे वाटपच केलेले नाही. आता वाटपाचे आदेशच नाही, असे अधिकारी सांगत आहेत.

आता या विम्याच्या पैशांचे वाटप झाले नाही, तर आंदोलनाचा इशारा शिवसेनेने दिला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमुळे विदर्भ पोळून निघाला आहे. आता हक्काच्या पीक विम्याचेही पैसे मिळत नसतील, तर करायचे तरी काय, असा बळीराजाचा सवाल आहे.

close