कोल्हापुरातील पूरस्थिती जैसे थे

July 29, 2010 2:12 PM0 commentsViews: 65

29 जुलै

कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती जैसे थे आहे. आज दिवसभरात पावसाची उघडझाप होती.

सकाळी साडे नऊ वाजताच राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले गेले. त्यातून आधी 14 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र दिवसभर पावसाचा जोर कमी झाल्यामुळे आता धरणातून 10 हजार क्युसेक्स पाणी सोडले जात आहे.

पंचगंगा नदीची पातळी 42 फूट 2 इंच इतकी स्थिर आहे.

पंचगंगेची धोका पातळी 43 फूट इतकी आहे. पुरामुळे 54 हून अधिक गावांचा संपर्क अंशत: तुटला आहे.

फेजिवडे गावच्या गावकर्‍यांना केंद्रीय विद्यालय आणि एमएसईबीच्या परिसरात हलवण्यात आले आहे. तर कोल्हापुरातील सुतारवाडा येथील 18 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

सिंधुदुर्गला झोडपले

सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज दिवसभर पावसाने झोडपले. कणकवली आणि कुडाळ तालुक्याला याचा जास्त फटका बसला. कणक वलीच्या जानवली नदीच्या पुराचे पाणी आसपासच्या वस्तीत घुसले.

कलमठ लांजेवाडी भागातही मोठ्या प्रमाणात पाणी भरले. त्यामुळे तेथील गावकर्‍यांना धोका निर्माण झाला आहे. तसेच कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे व्यापार्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सावंतवाडी तालुक्यातील बांदा बाजारपेठेतही पाणी भरले आहे. मुंबई गोवा महामार्गावरची बेल नदीही भरुन वाहत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

close