महागाईवर तडजोडीची शक्यता

July 29, 2010 3:27 PM0 commentsViews: 3

29 जुलै

महागाईच्या मुद्द्यावरच्या चर्चेविषयी सरकार आणि विरोधकांत तडजोड होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर एक ठराव आणून कोंडी फोडण्याचा सरकार विचार करत आहे. याबाबतचा निर्णय शुक्रवारी सकाळी घेण्यात येईल.

दरम्यान, एनडीएच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेतली. आणि दरवाढ कमी करण्याचे निवेदन सादर केले. त्यांच्या स्वाक्षरी मोहिमेत दहा कोटी लोकांनी भाग घेतल्याचा दावा एनडीएने केला आहे.

निवेदनांनी भरलेली पोती भाजपचा झेंडा असणार्‍या गाडीतून राष्ट्रपती भवनात नेण्यात आली. त्यापूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज आज सलग तिसर्‍या दिवशी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

महागाईच्या मुद्द्यावर नियम 184 अंतर्गत चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. पण संसदीय कामकाज मंत्री पवनकुमार बन्सल यांनी त्याला विरोध केला. त्यामुळे संसदेत मोठा गदारोळ झाला.

या गदारोळामुळे कामकाज स्थगित करण्यात आले. संसदेच्या बाहेर राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांनी आंदोलन केले.

close