मुंबईत मलेरियाचे 34 बळी

July 29, 2010 5:14 PM0 commentsViews: 2

रोहिणी गोसावी, मुंबई

29 जुलै

पावसाळा आला की धास्तावणार्‍या मुंबईला यंदाच्या पावसाळ्यात आणखी एका संकटाला तोंड द्यावे लागत आहे. आणि हे संकट आहे, मलेरियाचे. मलेरियाने आत्तापर्यंत 34 बळी घेतले आहेत. यामुळेच सामान्य मुंबईकरांमध्ये आता भीती पसरली आहे.

मुंबईत सुरू असलेली मोठ्या प्रमाणातील बांधकामे, अस्वच्छता यामुळे डासांची पैदास वाढली आहे. मलेरियाच्या आजाराची वाहक असते ती ऍनोफिलस डासाची मादी. या डासाच्या दंशाने हजारो मुंबईकर हैराण झाले आहेत.

मलेरियाच्या आकडेवारीवर एक नजर टाकूयात…

मलेरियाचे मुंबईतील पेशंट्स – 12,000

मलेरियाचे महाराष्ट्रातील पेशंट्स – 36,760

मलेरियामुळे मुंबईतील मृत्यू – 34

मलेरियामुळे 2009 मध्ये देशातील मृत्यू – 299

आता सावधगिरीचा उपाय म्हणून महापालिकेने संध्याकाळच्याही ओपीडी सुरू केल्या आहेत.

मलेरियाच्या पेशंटना कावीळीचा किंवा यकृताच्या आजारांचा धोका तर असतोच पण मलेरियामुळे हार्ट अटॅक येतो, असा गैरसमज पसरवण्यात आल्याने पेशंट आणि त्यांच्या नातलगांमध्ये घबराट पसरली आहे. प्रत्यक्षात मलेरिया धोकादायक असला, तरी तो हार्ट अटॅकला कारणीभूत ठरत नाही.

कोणत्याही आजाराचे सर्वात जास्त चटके सोसावे लागतात, ते गरीबांना. आणि मलेरियाचा फैलाव झोपडपट्‌ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळेच महापालिकेने आता मुंबई आरोग्य अभियान आणि गरीब मजुरांना हेल्थ कार्ड देण्याची योजना सुरू करून मलेरियाला आळा घालण्यास सुरुवात केली आहे. पण अजून मलेरिया पसरवणार्‍या या डासांचा फैलाव आटोक्यात येऊ शकलेला नाही.

सफाईबाबत उदासिनता

मुंबईत एकीकडे मलेरियासारख्या साथीच्या रोगांनी थैमान घातले असताना महापालिकेचे अधिकारी मात्र गटार आणि कचरा यांच्या सफाईसंदर्भात गंभीर असल्याचे दिसत नाहीत. शहरात अनेक ठिकाणी गटारांची सफाई व्यवस्थित न झाल्याने दुर्गंधी पसरली आहे. याचाच फटका नागरिकांना बसत आहे.

महापालिकेत मागणी

मुंबईतल्या मलेरियाच्या वाढत्या प्रसाराचा मुद्दा आज महापालिका सभागृहातही गाजला. मुंबई मलेरियाग्रस्त घोषित करा, अशी मागणी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केली. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेली अस्वच्छता, तुटलेल्या सांडपाण्याचे पाईप्स या सगळ्याच्या विरोधात त्यांनी सरकारला धारेवर धरले. ताबडतोब मुंबईतल्या स्वच्छतेचा आढावा घ्या, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सत्ताधारी असलेल्या शिवसेना भाजपनेही प्रशासनावर टीका केली.

मंत्रालयात बैठक

तर या प्रश्नावर आज मंत्रालयातही आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी बैठक घेतली. विशेष म्हणजे साथीच्या रोगांबाबत केंद्र सरकारचे दोन सदस्यही आले होते. त्यांनी मुंबईची पाहणी केली. आणि शहराच्या अस्वच्छतेवर टीका केली. शुक्रवारपासून मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात किमान दोन खासगी डॉक्टर्सकडे मलेरियाची मोफत औषधे मिळणार आहेत. हे औषध मुंबई महापालिका या डॉक्टरांना देईल. मुंबईत एकूण अडीच हजार ठिकाणी बांधकाम सुरू आहे.

त्यापैकी फक्त 264 बिल्डर्सनी पेस्ट कंट्रोल केले आहे. इतर बिल्डर्सना ताबडतोब पेस्टकंट्रोल आणि औषध फवारणीचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर ज्या वॉर्डात स्वच्छता नसेल, तिथे वॉर्ड ऑफिसरला जबाबदार धरण्याचे निर्धेश देण्यात आले आहेत.

'मलेरिया अनधिकृत बांधकामामुळे'

मुंबईतील अनधिकृत बांधकामे आणि झोपडपट्टयांमधील अस्वच्छतेमुळे मलेरिया पसरला आहे, असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवाय या झोपडपट्‌ट्या उभ्या राहण्यास राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे.

close