जनता दरबारात विष घेणार्‍या तरुणाचा मृत्यू

August 2, 2010 8:44 AM0 commentsViews: 2

गोविंद तुपे, मुंबई

2 ऑगस्ट

मुंबईतील गांधी भवनात काँग्रेसने आयोजित केलेल्या जनता दरबारात विष घेणार्‍या तरुणाचा अखेर मृत्यू झाला आहे. कैलास खटकाळे असे त्याचे नाव असून तो पुण्याजवळील चाकणचा राहणारा होता.

कंपनीत होणार्‍या पिळवणुकीच्या विरोधात कैलासने हा प्रकार केला. चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर काल रात्री कैलासने प्राण सोडला.

चाकणमधील थाई सुमित नील ऍटो कंपनीत तो काम करत होता. या कंपनीतील कामगारांना गेल्या पाच वर्षांपासून इथे पगार वाढ किंवा अन्य सवलती मिळत नाहीत. तसेच त्यांना युनियन स्थापन करण्यासही विरोध केला जात आहे. त्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापनाकडून धमकावले जात असल्याची तक्रारही हे कामगार करत आहेत.

आपले गार्‍हाणे घेऊन काँग्रेसच्या जनता दरबारात आलेल्या या कामगारांना नेत्यांनी साधी सहानुभुतीसुद्धा दाखवली नाही. जनता दरबार भरवून लोकांचे प्रश्न चुटकीसरशी सुटत नाही, हे एव्हाना प्रदेशाध्यक्षांच्याही लक्षात आले आहे.

अशा प्रकारच्या जनता दरबारातून जर लोकांचे प्रश्न सुटत नसतील तर मग जनता दरबाराचा फार्स तरी कशाला करायचा, सरकारला आणखी किती कैलासचे बळी हवेत, असा सवाल आता लोक करू लागले आहेत.

close