राज्यसभा निवडणुकीतील घोडेबाजार उघड

August 2, 2010 4:21 PM0 commentsViews: 10

2 ऑगस्ट

अलिकडेच राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुका महाराष्ट्रात बिनविरोध झाल्या तरी बाकीच्या राज्यांमध्ये यासाठी मतदान झाले. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आमदार मतदान करतात. पण हे कर्तव्य बजावताना झारखंडच्या आमदारांना आम्ही चक्क सौदेबाजी करताना पकडले.

ही सौदेबाजी सुरू होते, काँग्रेसचे आमदार राजेश रंजन यांच्यापासून…मते विकत घेण्यासाठी गेलेल्या आमच्या रिपोर्टरशी बोलताना हे महाशय मतासाठी कोटींची बोली लावतात…

राजकीय प्रवाहात देशभरातील विचारी आणि विवेकी लोकांचा सहभाग असावा म्हणून या सभागृहाची स्थापना झाली होती. देशाच्या उभारणीत त्यांचे योगदान असावे, हा त्यामागचा उद्देश धुळीला मिळवला गेला आहे.

आपल्या राजकीय व्यवस्थेला कशी कीड लागली आहे, हे आयबीएन नेटवर्क आणि कोब्रापोस्ट यांनी एक विशेष तपास करून उघड केले. झारखंड विधानसभेतील एक आमदार राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये आपल्या मताचा सौदा करायला तयार आहेत. त्यांना हवी आहे, मताची रोकड किंमत. .हो…तुम्ही काहीही चुकीचे वाचत नाही. व्होट फॉर नोट..पैशासाठी मत.. हा आहे…या झारखंडमधील आमदारांचा नारा…

राजेश रंजन… झारखंडमधील महागनाचे काँग्रेस आमदार. आमच्या रिपोर्टरला ते भेटले राजकीय मध्यस्थ म्हणून. ज्या राज्यसभेच्या उमेदवाराचे नावही त्यांना माहीत नाही, त्याला मत देण्यासाठी किती किंमत घ्यायची ते त्यांनी ठरवून टाकले आहे.

त्यावेळी झालेले संभाषण पुढीलप्रमाणे –

रिपोर्टर : किंमत सांगा…म्हणजे आम्हाला आमचं बजेट ठरवता येईल

रंजन : प्रत्येकासाठीची किंमत ठरलीय

रिपोर्टर : जे जे काँग्रेसमध्ये आहेत त्यांच्यासाठी ना…50 लाख ?

रंजन : हो

रिपोर्टर : आणि तुमची किंमत…एक कोटी ?

रंजन : हो

म्हणजे सौदा तर पक्का झाला. एका मतासाठी एक कोटी… जनतेची सेवा करण्याची राजेश रंजन यांनी शपथ घेतली आहे. पण असे करण्यानं त्यांची फसवणूक होईल, याची चिंता त्या एक कोटी रुपयांपुढे काहीच नाही… राजेश रंजन फक्त स्वत:साठी सौदा ठरवून थांबत नाहीत…आमच्या या तपासात दलाल म्हणून काम करायचीही त्यांची तयारी आहे. राजेश रंजन यांनी आमच्या उमेदवाराला मत देण्यासाठी आणखी काही आमदारांना गोळा केले.

हे संभाषण पुढीलप्रमाणे –

रंजन : मी आमदारांशी बोललोय. त्यांच्यासाठी 50-50 लाखांच्या नोटांची बंडलं तयार ठेवा..संध्याकाळी कधीतरी भेटूया.. ?रिपोर्टर : हो. पण मी थोडा बिझी आहे.

रंजन : मी त्यांना संध्याकाळी पाचची वेळ दिलीय

रिपोर्टर : ठीक आहे

रंजन : तुम्ही त्यांना भेटा आणि 50 -50 लाखांची बंडलं त्यांच्याकडे सोपवा

रंजन यांनी आमच्या रिपोर्टरला हेही सांगितले की काँग्रेसच्या 14 आमदारांपैकी 10 आमदार त्यांच्याबरोबर आहेत. यासाठी झारखंडच्या काँग्रेस हायकमांडचीही त्यांना पर्वा नाही.

हे संभाषण पुढीलप्रमाणे –

रंजन : आम्ही झारखंडचे काँग्रेस प्रभारी केशव राव यांच्या मताला जुमानत नाही. आमचं दुसर्‍या पसंतीचं मत आम्ही देऊ नये, असं त्यांना वाटतंय.

रिपोर्टर : ते तुमच्यावर कारवाई करू शकतात ?

रंजन : नाही करू शकत..आम्ही 10 जण आहोत. आमच्यावर कारवाई केली आणि आम्ही मतदानच केलं नाही तर काँग्रेसचा उमेदवार हरू शकतो.

वाहत्या गंगेत पुरेपूर हात धुवून घ्यायची तयारी रंजन यांनी केली. केवळ त्यांच्यासाठीच नाही तर त्यांच्या आणखी साथीदारांसाठीही…झारखंड विधानसभेतले काँग्रेस नेते राजेंद्र सिंग यांना विकत घ्यायची तयारी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली.

हे संभाषण पुढीलप्रमाणे –

रंजन : या यादीत राजेंद्र सिंग यांचं नाव घालून टाका..ते काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत.

रिपोर्टर : ते आपल्याबरोबर येतील?

रंजन : आपण त्यांना विश्वासात घेतलं तर त्याची मदत होईल.

रिपोर्टर : म्हणजे मग काँग्रेसच्या आमदारांसाठी ते पक्षादेश काढणार नाहीत..बरोबर?

रंजन : म्हणूनच ते महत्त्वाचे आहेत. माझं त्यांच्याशी बोलणं झालंय.

अशा प्रकारे सर्वच पक्षीय आमदारांमध्ये ही सौदेबाजी झाली.

close