औरंगाबादमध्ये स्थलांतरित कामगारांच्या अस्तित्वाचा मुद्दा ऐरणीवर

October 24, 2008 5:10 AM0 commentsViews: 9

24 ऑक्टोबर, औरंगाबाद – उपासमार, दारिद्र्य आणि पिळवणुकीच्या कचाट्यात सापडलेल्या बिहार, उत्तरप्रदेशातील लोकांना रोजीरोटीसाठी नाईलाजास्तव गाव सोडावं लागत आहे. कमी पैशात जनावरांसारखं राबणार्‍या या लोकांना काम देणार्‍या कंत्राटदारांची लॉबीच महाराष्ट्रात तयार झाली आहे. मजुरांची पिळवणूक हा तर गंभीर प्रश्न आहे. बिहार, छत्तीसगढ आणि ओरिसातील मजूर म्हटलं की कंत्राटदार खूश असतात. कारण कमी पैशात ते राब राब राबतात. औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत असे अनेक कामगार आहेत. मान खाली घालून फक्त काम करणार्‍याअशा कामगारांमुळे चौकाचौकांत उभ्या राहणार्‍या स्थानिक मजुरांना मात्र रोजगार मिळेलच याची शाश्वती नसते. सर्वात गंभीर म्हणजे यात बालमजुरांची संख्याही मोठी आहे. कमी पैशांत राबणार्‍या या उत्तरभारतीय मजुरांकडून खूप काम करून घेतलं जातं. 'आई जेवू घालेना आणि बाप भीक मागू देईना' अशीच अवस्था बिहार उत्तरप्रदेशातील लोकांची झाली आहे. त्यांची उपासमार होत आहे आणि नेते त्यावर राजकीय पोळी भाजतात. मग ते लालूप्रसाद यादव असोत अथवा राज ठाकरे… गावाकडे काम मिळत नाही म्हणून त्यांना घरदार सोडून महाराष्ट्रात यावं लागतं. त्यांच्या या मजबुरीचा प्रत्येकजण फायदा घेतात केवळ मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्राच्या सर्वच भागात बिहार, ओरिसा, उत्तरप्रदेशातील मजूर कामगारांची ही अशी अवस्था आहे. काम करण्यासाठी कुणालाही कुठंही जाण्याचा घटनात्मक अधिकार आहे, पण दारिद्र्यामुळे होणारं स्थलांतर आणि पिळवणुकीचा प्रश्न सोडवायचा कुणी हा प्रश्न अनुत्तरीतच राहातो.

close