प्रभावी कामासाठी नेमा पुरुष अधिकारी…

August 4, 2010 10:02 AM0 commentsViews: 8

4 ऑगस्ट

प्रभावी कामासाठी पुरुष अधिकार्‍यांना नेमा, अशी अफलातून सूचना राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. मुश्रीफ यांनी या संदर्भात धर्मदाय आयुक्तांना एक पत्र पाठवून ही सूचना केली आहे.

महिला अधिकारी कामात कितीही तत्पर असल्या, तरी त्यांना कोणीही दाद देत नाही, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. राज्यातील अनेक धर्मादाय हॉस्पिटल्स योग्य रितीने काम करत नाहीत. तिथे गरिबांची थट्टाही उडवली जाते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

या हॉस्पिटलच्या तपासणीसाठी महिला अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली होती. या महिला अधिकार्‍यांनी कितीही तत्परतेने काम केले तरी त्यांना कुणी दाद देत नाही…कारण महिला अधिकार्‍यांच्यादेखील शेवटी काही मर्यादा आहेत…प्रभावीपणे काम व्हायचे असेल तर पुरूष अधिकार्‍यांची तात्काळ नियुक्ती करावी…सर्व अधिकार्‍यांना याबाबत ताकीद द्यावी…तसेच दोन-तीन महिन्यांनी राज्याच्या धर्मादाय दवाखान्यांचा आढावा घ्यावा, अशा सूचना मुश्रीफ यांनी केल्या.

कामगार मंत्र्यांच्या आदेशाबरहुकूम धर्मादाय आयुक्तांनी अनेक हॉस्पिटल्समध्ये महिला वैद्यकीय निरीक्षकांची बदली करून त्यांच्या जागी पुरूष वैद्यकीय निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

close