मुंबईतील मलेरियासाठी आरोग्य कर्मचारी अपुरे

August 5, 2010 10:55 AM0 commentsViews: 2

अलका धुपकर, मुंबई

5 ऑगस्ट

मुंबईतील मलेरिया आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या हॉस्पिटल्समधील डॉक्टरांची टीम आणि इतर कर्मचारी फायर ब्रिगेडप्रमाणे काम करत आहे. पण सर्व हॉस्पिटल्समध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचार्‍यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पॅथॉलॉजी, रेडिऑलॉजी, सफाई कामगार, नर्सेस या सगळ्यांवरच ताण पडून पेशंट्सची गैरसोय होत आहे. एकेका टेस्टसाठी त्यांचे तासन्‌तास ताटकळावे लागत आहे.

सुपरस्पेशालिटी असो की पेरिफिरल मुंबईतल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या लांबच लांब रांगा आणि उपचारांची वाट बघणारे शेकडो चेहरे दिसतात. कुणाला रक्त तपासायचे आहे, कुणाला सोनोग्राफी करायची आहे. पण लॅब टेक्निशिअन्स, तंत्रज्ञ, लॅब सहाय्यक ही पद भरली न गेल्यामुळे चार कर्मचार्‍यांचे काम एकच कर्मचारी करताना दिसतो. पेशंट्सची गर्दी वाढते, पण कामाचा वेग वाढू शकत नाही.

बीएमसीची तीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स, 16 पेरिफिरल हॉस्पिटल्स, दवाखाने आणि हेल्थ पोस्टमध्ये चर्तुर्थश्रेणी कर्मचार्‍यांचीच साडेतीन हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. आणि साथीला युद्धपातळीवर सामोरे जाणार्‍या बीएमसी आयुक्तांना उशिराने याची आठवण झाली आहे.

एकीकडे डासांना रोखणारी फॉगिंग मशीन्स धूळ खात आहेत, दुसरीकडे पेशंट्सना उपचार देणार्‍या कर्मचार्‍यांचा तुटवडा, अशा मूलभूत समस्या न सोडवता बीएमसी मलेरियाला अटकाव घालणार तरी कसा, हा मुंबईकरांना प्रश्न पडला आहे.

close