राज्यात साथीच्या रोगांचा धुमाकूळ

August 5, 2010 12:06 PM0 commentsViews: 4

5 ऑगस्ट

राज्यात सध्या साथीच्या रोगांनी धुमाकूळ घातला आहे. महिनाभरात राज्यातील तीन जिल्ह्यात H1N1चे 26 बळी गेले आहेत. कोल्हापूरमधे 8, नाशिकमधे 8 तर सांगलीत 10जणांचा मृत्यू झाला आहे.तर पुण्यात एप्रिल महिन्यापासून 93 जणांचा H1N1 मुळे मृत्यू ओढवला आहे.

औरंगाबादमध्ये 25 बळी

औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात साथीच्या रोगांच्या फैलावानंतर आता H1N1नेही डोके वर काढले आहे. चोवीस तासात H1N1 मुळे पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. तर आठवडाभरात मृतांची संख्या सहावर गेली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत H1N1 मुळे 25 जणांचा मृत्यू झाला आहे.

हिंगोलीत पेशंटची गर्दी

हिंगोली जिल्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये पेशंटनी मोठी गर्दी केली आहे. कॉट अपुर्‍या पडत असल्याने जमिनीवर गाद्या टाकून पेशंटवर उपचार केले जात आहेत. या पेशंटमध्ये गॅस्ट्रो, तापाचे पेशंट आहेत. मुळात हिंगोली जिल्हा हॉस्पिटलचा दर्जा असला तरी इथे सुविधा उपजिल्हा हॉस्पिटलच्या आहेत. हॉस्पिटलमध्ये 200 कॉटऐवजी फक्त 100 कॉट आहेत. त्यातीलही 25 नादुरुस्त आहेत.

कोल्हापुरात गोंधळाची स्थिती

कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलमध्ये सध्या प्रचंड गोंधळाची स्थिती आहे. इथे आत्महत्येचा इशारा देत एक महिला डॉक्टर बेपत्ता झाली आहे. काही दिवसांपूर्वी या हॉस्पिटलमध्ये H1N1 च्या पेशंट्सकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरुन डॉक्टर अनुष्का वाईकर या डॉक्टरला निलंबित करण्यात आले होते. पण या निलंबनानंतर या महिला डॉक्टरलाच H1N1 झाल्याचे निष्पन्न झाले. आणि आता याच डॉक्टरने आत्महत्येचा इशारा दिला आहे.

येथील डॉक्टरांनी थेट काम बंद करण्याचा इशारा देत वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना धारेवर धरले आहे. दरम्यान या डॉक्टर महिलेच्या भावानेही 'माझ्या बहिणीला काही झाले तर मीही आत्महत्या करीन' असा इशारा दिला आहे. आजपर्यंत स्वाईन फ्लूमुळे जिल्ह्यातील 11 जणांचा बळी गेला आहे.

जळगावातील पेशंट वाढले

जळगावमध्येही साथीच्या आजारांमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणार्‍या पेशंट्सची संख्या वाढली आहे. त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये पेशंट्सची गर्दी वाढली आहे. तिथे कमी बेड असल्याने 2 पेशंटना एका बेडवर झोपावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी इथे संसर्गजन्य पेशंटच्या वॉर्डला आग लागली होती. त्यानंतर या पेशंटनाही वेगळ्या रूममध्ये हलवण्यात आलेय. त्यामुळे बेडची संख्या कमी झाली आहे.

नाशिकमध्ये H1N1चे 4 बळी

नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसात H1N1 च्या 3 पॉझिटीव्ह पेशंटचा तर एका संशयीत पेशंटचा मृत्यू झाला. मृतांमध्ये गरोदर महिला आणि वृद्धांचा समावेश आहे. ते सिन्नर, कळवण, ओझर आणि नाशिकरोड या ठिकाणी राहत होते. नाशिकच्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये H1N1 चे 31 संशयीत पेशंट उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे सिव्हील हॉस्पिटलमध्ये यांच्यासाठी औषधे उपलब्ध नसल्याच्या त्यांच्या नातलगांच्या तक्रारी आहेत.

close