विधानपरिषद निवडणुकीत मतं फुटल्याने काँग्रेस आघाडीला धक्का

October 24, 2008 7:26 AM0 commentsViews: 6

24 ऑक्टोबर, मुंबईविधानपरिषदेची जागा काँग्रेसच्या मधू जैन यांनी जिंकली असली तरी या निवडणुकीत काँग्रेस आघाडीची फुटलेली मतं हाच चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपाचे नवनाथ आव्हाड यांचं विधानपरिषद सदस्यत्व रद्द झाल्यामुळे ही निवडणूक झाली. पण यात सुरेश हावरेंचा पराभव करून मधू जैन एकदाच्या विजयी झाल्या. पण काँग्रेस आघाडीची 29 मतं फुटली. यावर संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, 'अपेक्षित मतदान झालं नाही. आघाडीची स्ट्रेंथ पूर्ण वापरली गेली नाही '. मधू जैन यांच्या उमेदवारीबद्दल मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच मधू जैन यांचे दीर सुरेशदादा जैन यांचं राष्ट्रवादीशी पटत नसल्यामुळे या सगळ्यांचा परिणाम निवडणुकीवर होईल, असं म्हटलं जात होतं. सहा मतांनी सुरेश हावरेंना विजयानं हुलकावणी दिली. ' राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्तारूढ आघाडीची मतं फुटली आहेत. हा आघाडीला धक्का आहे ', अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी निवडणुकीच्या निकालावर दिली. काँग्रेस आघाडीतील सुंदोपसुंदीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. त्यामुळे आता येत्या निवडणुकीत एकदिलानं काम करायचं की नाही, असा प्रश्न त्यांना पडण्याची शक्यता आहे.

close