जेएनपीटी बंदरातील वाहतूक ठप्प

August 10, 2010 5:04 PM0 commentsViews: 6

10 ऑगस्ट

मुंबईत जेएनपीटीजवळ शनिवारी एमएससी चित्रा आणि खलीजिया या दोन जहाजांच्या टकरीनंतर तेल गळती थांबवण्यात आली. मात्र आता जेएनपीटी आणि बीपीटी या बंदराची वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे 27 मालवाहू जहाजं अडकून पडली आहेत. आणि मुंबईच्या बंदरात येणारी 31 जहाजं मुंबई बाहेर प्रतीक्षेत आहेत.

त्यातली काही जहाजं ही पेट्रोलियम पदार्थ घेऊन येणारी जहाजं आहेत. त्यामुळं शुक्रवारपर्यंत वाहतूक सुरळित करण्याचा प्रयत्न युद्धीपातळीवर सुरु आहे. समुद्रात पसरलेल्या तेलाचा तवंग मुंबईच्या परिसरात आला आहे. त्याच्या पाण्याचे नमुने घेण्यात आलेत. या तेलाच्या तवंगांमुळे मॅन्ग्रुव्हची हानी होऊ नये म्हणून किनार्‍यावर गनी बॅग्ज, सक्शन पंप लावण्याचा पर्याय पुढं आला आहे. तसंच गरज पडली तर मॅन्ग्रुव्हज पुन्हा लावण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

मच्छिमारांची नुकसान भरपाईची मागणी

अरबी समुद्रात झालेल्या तेलगळतीमुळे 15 ऑगस्टपर्यंत मासेमारी करु नये असं आवाहन पर्यावरण मंत्रालयाने मच्छिमारांना केले आहे. त्यामुळे मासेमारीवर सध्या निर्बंध घालण्यात आला आहे.

पण आता या तेलगळतीमुळे आणि समुद्रात कंटेनर वाहत गेल्यामुळे मासेमारांची जाळी खराब झाल्याच्या घटनाही आता पुढे येत आहेत. कंटेनर वाहत गेल्यानं अलिबाग, मुरूड, उरण मधील मच्छिमारांच्या जाळ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे जाळी खराब झाल्यानं नवीन जाळी तयार करेपर्यंत 2 महिने मासेमारी करता येणार नाही, असं मच्छिमारांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच मच्छिमारांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

मुंबईतील तेलगळतीनंतर अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी आज किनारपट्टींचा दौरा केला. यावेळी बोलताना त्यांनी कंटेनरमुळे नुकसान झालेल्या मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्यात येईल असं सांगितलं.

close