मुलांची बेकायदेशीर विक्री प्रकरणी जे एस भसीन यांना अटक

August 10, 2010 5:12 PM0 commentsViews: 7

10 ऑगस्ट

पुण्याच्या प्रीत मंदिर संस्थेचे प्रमुख विश्वस्त जे. एस. भसीन यांना मुंबई सीबीआयनं अटक केली आहे. प्रीत मंदिर ही संस्था मुल दत्तक देण्यासाठी आणि अनाथ मुलांचं संगोपन करणारी संस्था म्हणून प्रसिद्ध आहे. या संस्थेतून मुलांना बेकायदेशीररित्या परदेशात विकणे, बेकायदेशीररित्या दत्तक देणे, मुलांचं संगोपन नीट न करणे, अशा प्रकारचे गंभीर आरोप न्यायालयाच्या तक्रारीत करण्यात आले. याची दखल घेत 2009 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयनं केलेल्या कारवाईत ही अटक केल्याची माहिती मिळत आहे.

औरंगाबाद शहरातलं प्रीत मंदिर युनिट बंद होण्याच्या मार्गावर

प्रीत मंदिर ही संस्था मुल दत्तक देण्यासाठी आणि अनाथ मुलांचं संगोपन करणारी संस्था म्हणून प्रसिद्ध आहे.त्याचं शासकीय शिशू सदन युनिट तीन औरंगाबाद शहरातल्या पदमपुरा भागात आहे. ही संस्था बलवंत कतार आनंद फाऊंडेशनच्या वतीनं चालवली जाते. मागील आठ वर्षांपासून प्रीत मंदिर औरंगाबाद शहरात काम करत आहे. सध्या या संस्थेत 32 लहान मुलं मुली आहेत, तसंच गेल्या वर्षात त्यांनी 14 मुलं दत्तक दिली आहेत. पुण्यात लहान मुलांच्या विक्रीचं प्रकरण समोर आल्यानंतर, औरंगाबाद शहरातलं प्रीत मंदिर युनिट बंद होण्याच्या मार्गावर आहे. 2006 सालापासून इथं अनाथ मुलांचे संगोपन केले जात आहे.

close