किनार्‍यावर तेलसंकट

August 11, 2010 2:08 PM0 commentsViews: 5

11 ऑगस्ट

जहाजांची टक्कर झाल्याने एमएससी चित्रा या जहाजातून होणार्‍या तेलगळतीमुळे मुंबईसह उरण आणि अलिबागच्या समुद्रकिनार्‍यांवर मोठ्या प्रमाणात तेल पसरलंय. तसंच या भागातील समुद्रकिनार्‍यावर जहाजातील कंटेनरसुध्दा वाहुन आल्याने इथे चिंतेचं वातावरण आहे.

बुधवारी उरणच्या किनार्‍यावर रसायनांनी भरलेल्या बाटल्या सापडल्या. या बाटल्यांमध्ये गोळ्या असल्याचं काही गावकर्‍यांनी सांगितलं. या गोळ्या पाण्यात टाकल्यास त्यातून धूर निघतो आणि डोळे चुरचुरतात, अशी माहिती गावकर्‍यांनी दिली. या बाटल्या किनार्‍यावरुन हटवण्याचं काम गावकरी काही विद्यार्थ्यांच्या मदतीने करण्यात येत आहे.

बंदरातील वाहतूक ठप्प

मुंबईत जेएनपीटीजवळ शनिवारी एमएससी चित्रा आणि खलीजिया या दोन जहाजांच्या टकरीनंतर तीन दिवस बंदरातील वाहतुक विस्कळीत झाली . अजूनही जेएनपीटी आणि बीपीटी या बंदरांमध्ये वाहतूक ठप्प आहे. यामुळे 27 मालवाहू जहाजं अडकून पडली आहेत. आणि मुंबईच्या बंदरात येणारी 31 जहाजं मुंबई बाहेर प्रतिक्षेत आहेत.

रायगडच्या समुद्रकिनार्‍यावर 18 कंटेनर

रायगडमधल्या अलिबाग इथल्या नवखार समुद्रकिनार्‍यावर 18 कंटेनर वाहून आले आहे. त्यात 40 बाटल्यांचाही समावेश आहे. या बाटल्या चित्रा जहाजातील कंटेनरमधल्या असण्याची शक्यता आहे. या बाटल्यांमध्ये घातक द्रव्यं असण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री सुनील तटकरेंनी या बाटल्यांची पाहणी केली. या बाटल्या मांडवा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, समुद्र किनार्‍यावरील अनोळखी वस्तूंना हात न लावण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

काळवंडून गेलं खारफुटीचं जंगल

समुद्रकिनारी असलेल्या मॅनग्रुव्हज् म्हणजेच खारफुटीच्या जंगलात तेल शिरलं आहे. त्यामुळे खारफुटीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचं चित्र दिसत आहे. वाशी ते बेलापूर या खाडीकिनार्‍यालगत मोठ्या प्रमाणात तेल जमलं आहे. पण तेल काढण्यासाठी सध्या कोणतीही यंत्रणा अजूनही कार्यरत झालेली नाही. त्यामुळे किनार्‍यावरच्या या समृद्ध पर्यावरणाला मोठा धोका आहे. हिरवंगार खारफुटीचे जंगल अक्षरश: काळवंडून गेले आहे. माशांचा ब्रीडींग सीझन, खारफुटीत असणारी पक्षांची अंडी, तिथले प्राणी जीवन या सगळ्यावरच या तेलसंकटाची छाया आहे.

तेलगळतीमुळे मासेविक्रेत्यांचं नुकसान

तेलगळतीचा फटका मुंबईतल्या मासेविक्रेत्यांनाही बसला आहे. बुधवारी मासेमार्केटमध्ये ग्राहक फिरकलेच नाही. मुंबई महानगरपालिकेकडून मासे तपासणीची मोहीम सुरु आहे. मासे खरेदी करताना सावधानता बाळगण्याचं आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केला आहे.

घातक रसायनांमुळे अपघाताची शक्यता

पर्यावरण विभागानं मुंबईजवळील अरबी समुद्रात चित्रा जहाजाच्या अपघातामुळे पसरलेल्या कंटेनरसंदर्भात माहिती प्रसिद्ध केली. अशा प्रकारच्या कंटेनरला उघडल्यामुळे त्यातील घातक रसायनांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. काही कंटेनर्सचा स्फोटही होऊ शकतो अशी भीतीही पर्यावरण विभागाने व्यक्त केली. काही कंटेनरची यादीही सरकारने जाहिर केली आहे.

घातक रसायनांमुळे अपघाताची शक्यता

पर्यावरण विभागानं मुंबईजवळील अरबी समुद्रात चित्रा जहाजाच्या अपघातामुळे पसरलेल्या कंटेनरसंदर्भात माहिती प्रसिद्ध केली. अशा प्रकारच्या कंटेनरला उघडल्यामुळे त्यातील घातक रसायनांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. काही कंटेनर्सचा स्फोटही होऊ शकतो अशी भीतीही पर्यावरण विभागाने व्यक्त केली. काही कंटेनरची यादीही सरकारने जाहिर केली आहे.

जहाजांचे कोट्यवधीचे नुकसान

जहाजंाच्या टकरीनंतर मुंबईच्या समुद्रात जहाजांना बंदी घालण्यात आली आहे.यामुळे व्यापारी जहाजांचं कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. 15 ऑगस्टपर्यंत वाहतूक सुरळीत होईल असा दावा कोस्ट गार्डनं केला आहे.

मेलेले मासे सापडले

समुद्रात पसरलेले तेल आता वेगवेगळ्या भागांमध्ये पसरू लागले आहे. मांडवा, रेवस, किहीम, सासवणे या समुद्रकिनार्‍यांच्या वाळूमध्ये हे तेल 6 इंचापर्यंत झिरपले आहे. हे तेल बाजूला काढणं केवळ अशक्य आहे. याशिवाय खारफुटीत तेलाचे काळेकुट्ट थर साचले आहे. उरण, पीरवाडीच्या समुद्रकिनार्‍यावर मोठ्या प्रमाणात मेलेले मासे आलेले होते. त्या माशांवर तेलाचा मोठा थर आढळून आला. याशिवाय कोळी लोकांच्या जाळ्यांमध्येसुद्धा मेलेले मासे सापडले आहे.

close