गिलख्रिस्टच्या आरोपावर प्रतिक्रिया द्यायला सचिनचा नकार

October 24, 2008 12:34 PM0 commentsViews: 2

अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या आरोपावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायला सचिन तेंडुलकरने नकार दिला. पुण्याजवळ पिंपरी-चिंचवड इथं माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांनी क्रिकेट अकॅडमी सुरू केली आहे. तिच्या उदघाटनासाठी सचिन आज पुण्यात आला होता. सहाजिकच जमलेल्या पत्रकारांनी त्याला गिलख्रिस्टने त्याच्यावर केलेल्या टीकेविषयी विचारलं असता सचिनने त्याविषयी बोलायला ठामपणे नकार दिला. आपल्याला काही बोलायचं नाही, असं त्याने सांगितलं. गिलख्रिस्टने त्याच्या आत्मचरित्रात सचिनवर अप्रामाणिकपणाचा आरोप केला आहे. हरभजन – सायमंड्स वादाच्या सुनावणी दरम्यान साक्ष देताना सचिन खोटं बोलला असा आरोप गिलख्रिस्टने केला आहे. सचिनच्या दोन वक्तव्यात विरोधाभास असल्याचं गिलख्रिस्टचं म्हणणं आहे. गेल्यावर्षीचा भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा हरभजन आणि सायमंड्समध्ये झालेल्या वादामुळे गाजला होता. वाद आता शांत झाला असं वाटत असतानाच गिलख्रिस्टच्या ताज्या वक्तव्यामुळे वादाला नवी दिशा फुटली आहे.याप्रकरणाबद्दल निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनीही गिलख्रिस्टच्या टिकेत फारसं तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. प्रसिद्धि मिळवण्यासाठीच असे उद्योग केले जातात असं त्यांनी म्हटलं आहे.

close