क्रांतीकारी महाकवी हरपला

August 16, 2010 5:53 PM0 commentsViews: 72

16 ऑगस्ट

कष्टकरी कामगार वर्गाबरोबरच शोषितांचे दु:ख पोटतिडकीने मांडणारे, क्रांतीकारी महाकवी नारायण सुर्वे यांचे सोमवारी दीर्घ आजारानं निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. ठाण्यातल्या हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये या महाकवीनं अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून नारायण सुर्वे आजारी होते. त्यामुळे उपचारांना शरीरही फारसं प्रतिसाद देत नव्हतं. याआधीही दोन वेळा त्यांना ऍडमिट करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती सुधारली होती. पण यावेळी मात्र ते नियतीवर मात करू शकले नाहीत आणि आयुष्यभराची धग सोसलेला हा लढवय्या क्रांतीकारी कवी आपल्यातून निघून गेला.

नारायण सुर्वेंच्या निधनानं साहित्यविश्वावर शोककळा पसरली. अशा या थोर क्रांतीकारी महाकवीला सरकारी इतमामात दादरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं पार्थिव प्रभादेवी इथल्या लोकवाड्मयगृहात अंत्यदर्शनासाठी संध्याकाळपर्यंत ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर तिथून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना पोलिसांनी फेरी झाडून अखेरची सलामी दिली. अनेक राजकीय नेते आणि साहित्यक्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी हजर होते.

शोषितांचं दु:ख मांडून, त्यांच्या जगण्याचं प्रखर वास्तव सुर्वे मास्तरांनी कायम आपल्या साहित्यातून मांडलं.

''एका अनाथाने व्यापले आभाळ ना घर होते ना गणगोत,चालेन तेवढी पायाखालची जमीन होती''…

अशा फुटपाथवारच्या बेवारस विद्यापीठात शिकलेले कविवर्य नारायण सुर्वे. 1926-27 मध्ये मुंबईतल्या चिंचपोकळीत एका कापडगिरणीसमोरच्या फूटपाथवर हा अनाथ तान्हा जीव कुणीतरी सोडून दिला. गिरणी कामगार गंगाराम सुर्वे आणि काशीबाई सुर्वेंनी त्याला पोटाशी धरलं. परळच्या बोगद्याच्या चाळीत या नारायण गंगाराम सुर्वेचं जगणं दारिद्र्य, काबाडकष्ट आणि संघर्षात शेकून निघालं.

जेमतेम चौथी पास झालेल्या नारायणाच्या हातावर एक दिवस रिटायर्ड झालेल्या गंगाराम सुर्वेंनी 10 रूपये ठेवले अन् कोकणातलं गाव गाठलं. तिथून पुढं सुरू झाली ती अनाथ नारायणाची भाकरीचा चतकोर चंद्र मिळवण्यासाठीची लढाई. हॉटेलातला पोर्‍या, घरगडी, घर सांभाळणारा हरकाम्या अशी कामं करताना बाळपण सरलं. मग हमाली करणारा तरूण नारायण महापालिकेच्या शाळेत शिपाई झाला. 1957 मध्ये व्हॅर्न्याक्युलर फायनल पास होऊन मास्तरही झाला. गिरणगावच्या या सुर्वे मास्तरांनी 'कधी दोन घेत… तर कधी दोन देत…' जिंदगीच्या धगीवर शब्द शेकून घेत, मराठी काव्यात एक नवा सूर घुमवला… त्यांची पहिली कविता 1958 मध्ये नवयुग मासिकात प्रसिध्द झाली. 'डोंगरी शेत माझ ग' हे या त्यांच्या गीताची एचएमव्हीनं ध्वनीफीत काढली. आणि कवी नारायण सुर्वे महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात पोहोचले.

1962 मध्ये त्यांच्या 'ऐसा गा मी ब्रम्ह'ला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर माझे विद्यापीठ, जाहीर नामा, पुन्हा एकदा कविता, सनद या त्यांच्या कविता संग्रहांनी इतिहास घडवला. त्यांच्या कविता कामगारांच्या, कष्टकर्‍यांच्या व्यथा मांडत राहिल्या. 1948मध्ये कृष्णाबाईंच्या रुपानं या अनाथ माणसाच्या आयुष्यात सावली आली. या सावलीनं त्यांची आयुष्यभर साथ दिली.

काबाडकष्ट सोसलेल्या या कवीचा पद्‌मश्री, सोव्हिएत रशियाचं नेहरू ऍवॉर्ड, जनस्थान पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, नरसिंह मेहता पुरस्कार, कराड साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार, असे अनेक पुरस्कार देऊन गौरव झाला. संत कबीरालाही त्याच्या आईनं नदीकाठी सोडलं. कबीर दोहे करायला लागला आणि मी कविता करायला…त्यालाही त्याची जात सांगता आली नाही अन् मलाही…असं सुर्वे म्हणत.

महाकवी नारायण सुर्वेंच्या निधनानं साहित्यविश्वावर शोककळा पसरली. अनेक जेष्ठ्य साहित्यिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच राजकीय क्षेत्रातुन नारायण सुर्वे यांच्या निधनाने पोकळी निर्माण झाली आहे असे मत व्यक्त होत आहे.

close