मराठी सिनेमाचं राजकारण

August 17, 2010 5:50 PM0 commentsViews: 9

17 ऑगस्ट

मराठी सिनेमे मल्टिप्लेक्समध्ये दाखवण्यात यावेत या मागणीसाठी मनसेने मल्टिप्लेक्सची तोडफोड केली. तर दुसरीकडे रस्त्यावरील खड्डयामुळे टोल नाकयाची तोडफोड केली. यावर मंगळवारी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तोडफोड करणा-यांकडून नुकसान भरपाई करणार असा इशारा दिला आहे.

मुंबई महानगरपालिकेची निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन तोडफोड आंदोलनं केली जात आहे. त्यामुळे मल्टिप्लेक्सची तोडफोड करणार्‍या आंदोलकांवर सरकारनं कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांकडे केली. तर मुख्यमंत्र्यांनीही अशाप्रकारे कायदा हातात घेणार्‍यांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. तसंच टोल नाका आणि मल्टीप्लेक्सची तोडफोड करणा-यांकडून नुकसान भरपाई करणार असा इशाराही त्यांनी दिला.

भुजबळांची मार्मिक टिप्पणी

मराठी चित्रपट निर्माते आधी शिवसेनाप्रमुखांकडे दाद मागायचे. पण आता ते राज ठाकरे यांच्याकडे जातात, त्यांना वेळ मिळाला तर ते मुख्यमंत्र्यांकडे किंवा सांस्कृतिकमंत्र्यांकडे जातात, अशी मार्मिक टिप्पणी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. या निमित्ताने भुजबळांनी दोन नेम साधले आहेत. एकिकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राज ठाकरे यांचा दरारा आणि करिष्मा मराठी चित्रपटसृष्टीत जाणवतोय, अशा आशयाचं वक्तव्य करून भुजबळांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा पत्ता कट झाल्याचं सूचित केलं. तर दुसरीकडे, मराठी चित्रपट निर्मात्यांना वेळ मिळालाच तर त्यांना मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांकडे जावसं वाटतं, असं विधान करून भुजबळांनी मुख्यमंत्र्यांवरही नेम साधण्याची संधी सोडली नाही.

शिवसेना आणि मनसे आमनेसामने

मल्टीफ्लेक्सच्या मुजोरशाही विरोधात मनसेने मराठी निर्मात्यांची मोट बांधायला सुरूवात केली. तर शिवसेनेनेही मल्टीफ्लेक्स मालकांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. शिवसेना आणि मनसे या विषयावर आमनेसामने आलेले असताना आता काँग्रेसने मात्र या दोन पक्षांच्या हेतूवर शंका घेतली. त्यामुळे हा मुद्दा आता राजकीय बनला आहे.

close