कॉमनवेल्थ गेम्सचा आणखी एक घोटाळा

August 18, 2010 4:36 PM0 commentsViews: 2

18 ऑगस्ट

कॉमनवेल्थ गेम्समधल्या भ्रष्टाचाराचं आणखी एक नवं प्रकरण आता समोर आलं आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या बोलीच्या कागदपत्रात फेरफार झाल्याचं उघड झालं आहे. माजी क्रीडामंत्री विक्रम वर्मा यांनी यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. स्वतः आयोजन समितीचा अध्यक्ष होण्यासाठी कलमाडींनीच बोलीच्या कागदपत्रात फेरफार केलेत का, अशी शंका व्यक्त होत आहे.

कॉमनवेल्थची बोली 2003 मध्ये वाजपेयी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार नियोजन समितीचा अध्यक्ष सरकारकडून नेमला जाणार होता. तर, सुरेश कलमाडी यांचा विचार फक्त उपाध्यक्षपदासाठी करण्यात आला होता. पण डिसेंबर 2003 मधल्या बोलीच्या सुधारित कॉपीमध्ये मात्र काही महत्त्वाचे बदल दिसून आलेत. या कागदपत्रात नियुक्ती आणि इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन हे दोन शब्द काढण्यात आलेत. त्यामुळं 10 फेब्रुवारी 2005 मध्ये तयार झालेल्या नियोजन समितीचे अध्यक्ष होण्याचा कलमाडी यांचा मार्ग मोकळा झाला.

दरम्यान, कॉमनवेल्थ गेम्सच्या बांधकामांची पाहणी करण्यासाठी कॉमनवेल्थ फेडरेशनचे अध्यक्ष माईक फेनेल दोन दिवसांच्या भारत दौर्‍यावर आले आहे. नवी दिल्लीतल्या त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची आणि जवाहरलाल नेहरु स्टेडियमची त्यांनी पाहणी केली. पण त्यांनी आत्तापर्यंत कोणतीच प्रतिक्रिया मात्र दिलेली नाही.

close