नगरमध्ये वाळूमाफीयांची दहशत

August 19, 2010 1:25 PM0 commentsViews: 13

19 ऑगस्ट

अहमदनगरमध्ये दिवसेंदिवस वाळू माफीयांची दहशत वाढत चालली आहे. गुरुवारी प्रवरा नदिपात्रात बेकायदा वाळू वाहतूक करणार्‍या वाळू तस्करांवर कारवाई करायला गेलेल्या तहसिलदारावरच गावठी कट्यातून गोळ्या झाडण्याची खळबळजनक घटना नेवासा इथ घडली होती. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना नेवासा पोलीस स्टेशनच्या आवारातच घडली.

अहमदगरमध्ये अशी घटना घडण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही घडलेल्या अशाच काही घटनांवर एक नजर टाकूया

याआधीही वाळू तस्करीला विरोध करणार्‍यांची हत्या झाल्याची अनेक घटना अहमदनगरमध्ये घडल्यात

राहुरी तालुका : कोल्हार खुर्द

चार-पाच महिन्यांपूर्वी राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द या गावात वाळू तस्करीला विराध करणार्‍या 2 तरूणांना ट्रकखाली चिरडण्यात आलं. या संदर्भात आज पर्यंत कुणावरही कारवाई करण्यात आली नाही. या घटनेला ट्रक अपघात दाखवण्यात येऊन हि फाईल बंद करण्यात आली. त्यावेळी संतप्त जमावाने दोन ट्रकही जाळले.

राहुरी तालुका : मानोरी गाव

राहुरी तालुक्यातील मानोरी गावाच्या उपसरपंचानं बेकायदा वाळू वाहतुकीला विरोध केला होता. त्याचा विरोध मोडून काढण्यासाठी त्यांनाही टॅक्टरखाली चिरडून मारण्यात आलं.

राहुरी तालुका : चिंचोली

राहुरी तालुक्यातील चिंचोली या गावच्या सरपंचाच्या भावाला वाळू तस्करांनी ट्रकखाली चिरडून मारलं होतं.

ही सर्व तस्करी रात्रीच्यावेळी चालते. यावेळी कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदार अथवा इतर अधिकार्‍यांनाही मारण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. वाळू तस्करीवरती महसूल, पोलीस आणि आरटीओ या तिघांनी मिळून एकत्र कारवाई करणे गरजेचं असताना नगर जिल्ह्यात मात्र याचा अभाव दिसतोय. त्यामुळे वाळू तस्करांची दादागिरी दिवसेंदिवस वाढतांना दिसतेय. सामान्य माणसांना वाळू तस्कर सहज मारहाण करत होते. आता मात्र त्यांची मजल तहसीलदारांवर गोळीबार करण्यापर्यंत गेलीय. याची दखल प्रशासनानं घेणं गरजेचं आहे. नगर जिल्हायतील नदीकाठी राहणारी जनता या वाळू तस्करांच्या भीतीने जीव मुठीत धरून राहते. वाळू तस्करांविरूद्ध बोलणंही त्यांच्या जिवावर बेतू शकते. आतापर्यंत घडलेल्या घटनांमध्ये वाळू तस्करांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं पोलीस प्रशासन आणि सरकारवरही जनतेचा विश्वास राहीला नाही. पोलीस आणि महसूल खात्यातील काही कर्मचारी अधिकारी यांचे वाळू माफियांशी अर्थपूर्ण संबंध असल्याने तस्करांवर कारवाई होण्याऐवजी त्यांना अभय दिल्याचे चित्र नगर जिल्ह्यात दिसतंय.

close