आमदारांनाही हवी पगारवाढ

August 25, 2010 9:52 AM0 commentsViews: 5

25 ऑगस्ट

खासदारांना वेतनवाढ मिळाल्यानंतर आमदारांच्या वेतन आणि इतर भत्त्यांच्या रकमेत घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात एकूण वेतन आणि भत्ते वाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होऊन, आमदारांना दरमहा मिळणार्‍या रकमेत 70 हजार रुपयांपर्यंत वाढ होईल, असं म्हटलं जातंय.

सध्या आमदारांना वेतन आणि इतर भत्ते मिळून दरमहा 42 हजार रुपये मिळतात. आमदारांच्या मागणीनंतर गेल्या पावसाळी अधिवेशनात सध्याच्या वेतन आणि भत्त्याच्या रकमेत 50 टक्के वाढ सूचवणारा प्रस्ताव बनवण्यात आला. हा प्रस्ताव वेतन आणि भत्त्याबाबतच्या 15 सदस्यीय संयुक्त विधिमंडळ समितीसमोर आला. पण महागाईच्या पार्श्वभूमीवर नवा प्रस्ताव मंजूर करून, जनतेच्या रोष ओढवून घेण्यात काही अर्थ नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली. त्यामुळं हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. पण आता मात्र राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात या प्रस्तावाचं विधेयक मंजुरीसाठी मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर दुसरीकडे, विरोधकांकडून मात्र या प्रस्तावातली रक्कम आणखी वाढवण्याची मागणी होण्याची शक्यता आहे.

close